दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२१ | सातारा | कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. संस्थेची घटना लिहिताना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री हे या संस्थेचे पदसिध्द अध्यक्ष असतील, असे म्हटले आहे. मात्र, त्यांच्या विचारांना सध्या तिलांजली मिळाली आहे. रयत वर फुली मारुन एकाच कुटुंबाचे वर्चस्व या संस्थेवर निर्माण झाले. या संस्थेवर मुख्यमंत्र्यांना पदसिध्द अध्यक्षपद देण्यात यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.
खा. उदयनराजे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्माच्या रयतेला सोबत घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी तर स्त्री शिक्षणासाठी कवाडे उघडली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत महात्मा जोतिबा फुलेंनीही मुलींसाठी शाळा सुरु केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तर मोठ्या उदार भावनेने रयतेसाठी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. मात्र या वृक्षाला वाळवी लागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे.’
रयत शिक्षण संस्थेमध्ये राजघराण्यातील कोणालाही सभासद करुन घेतले नसल्यावरुनही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आमच्या कुटुंबाचं रयतच्या स्थापनेमध्ये मोठं योगदान आहे. मात्र, आमच्या घराण्यातील एकालाही संस्थेत सभासद करुन घेण्यात आलेलं नाही. संस्थेच्या ‘सवेसर्वा’ मंडळींना विचारलं तर ते बोर्डासमोर विषय ठेवावा लागेल, त्यांनी मंजुरी दिली तरच तुम्हाला सभासदत्व मिळेल, असे त्यांनी सांगितले. मला त्यांना सभासद म्हणून घ्यायचेच नाही. आमच्या जागा देऊनही आम्हाला सन्मानानं संस्थेत सभासदत्व दिलं जात नाही.
कर्मवीर आण्णांच्या दृष्टिने पाहिलं तर ही संस्था समस्त रयतेची आहे. ना कुठल्याही एका व्यक्तीची किंवा कुटुंबाची आहे. ही संस्था एका कुटुंबाच्या हातात गेली आहे. त्यांना वाटेल त्यालाच संस्थेवर सभासदत्व दिले जाते. कर्मवीरांनी विकेंद्रीकरणाचा विचार त्या काळात मांडला. मात्र सध्या शिक्षण संस्थेत देखील सत्तेचं केंद्रीकरण झालं आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या धर्तीवर सध्या कामकाज सुरु आहे, त्यामुळे संस्थेमधील लोकशाही संपुष्टात आलेली आहे.
जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी हवी
जिल्ह्यातील एमएच ११ व एमएच ५० या क्रमांकांच्या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी मी लेखी स्वरुपात केली आहे. हा टोल कोनाचा आहे, याचे मला देणे घेणे नाही. जिल्ह्यातील जनतेला टोलमाफी झालीच पाहिजे, असे उदयनराजे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
लंगोट घालून येऊ का?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन करणार का? असे विचारले असता उदयनराजजेंनी त्यांच्या वेगळ्या स्टाईलमध्ये उत्तर दिले. ते म्हणाले, मी आता लंगोट घालूनच येतो. पुढे कोण लढायला तरी पाहिजे, या त्यांच्या उत्तराने चांगलाच हशा पिकला.