स्थैर्य, फलटण, दि. २७ : फलटण तालुक्यात संगीत, चित्रकला, शिल्पकला, काष्ट शिल्प क्षेत्रात कार्यरत असलेल्या छोट्या-मोठ्या कलाकारांची सविस्तर माहिती गोळा करून त्यांची एकत्रित माहिती असणारी पुस्तिका कलारंग कला महोत्सव समितीने प्रकाशित करावी त्यातून फलटणमधील कलाकारांच्या कलेचा मागोवा घेता येईल. कलारंग कला महोत्सव फलटण संस्थेचे युवा चित्रकार संदीपकुमार जाधव यांच्या नेतृत्वाखाली गेली दोन वर्षे भरवण्यात आलेल्या कलारंग कलामहोत्सव यशस्वी वाटचालीमुळे या क्षेत्रातील कलाकारांच्या व विविध मान्यवरांच्या शासनाच्या सहकार्याने फलटणमध्ये कलाकारांसाठी कायमस्वरूपी कला दालन (आर्ट गॅलरी) उभारण्यासाठी या संस्थेला आपण सर्व प्रकारचे सहकार्य करू, असे प्रतिपादन या कला महोत्सवाचे व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी केले.
कलारंग कलामहोत्सवाच्या तिसऱ्या वर्धापन दिन समारंभ अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ महानंदा डेअरी मुंबई चे उपाध्यक्ष व डी. के. पवार उपस्थित होते.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात प्रारंभी दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला व कला देवता नटराज यांच्या मूर्तीला प्रमुख उपस्थितांच्या हस्ते पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. त्यांचा संदर्भ देत बेडकीहाळ म्हणाले, स्वतः अटलजी उत्तम कवी असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वात खंबीरपणा बरोबरच मृदू मार्दव व सौजन्य होते. अवघ्या दोन भाजप खासदारांवरून श्रद्धा व सबुरी आणि चिकाटी यासह लालकृष्ण अडवाणी यांच्या सहकार्याने त्यांनी देशात भाजपचे सरकार आणले. हा संयमी पणा व विरोधकांची ही सौजन्य सहिष्णुता राजकारणातील आजच्या सर्वच नेत्यांनी अंगी करण्यासारखा आहे.
फलटण तालुक्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांना एकत्र करून त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचे आदर्श व काळाची गरज असलेले कार्य या क्षेत्रातील एक धडपडणारे व्यक्तिमत्व संदीपकुमार जाधव यांनी ‘कलारंग कलामहोत्सव’ च्या माध्यमातून केले आहे. यातून अनेक कलाकार उदयास येतील तर नवोदितांना प्रोत्साहन मिळेल. फलटणकरांनाही नाविन्यपूर्ण कार्यक्रम पाहता येतील. आपण या उपक्रमांना आवश्यक ते सर्व सहकार्य करू, अशी ग्वाही महानंदा डेअरी चे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी दिली.
प्रारंभी या संस्थेचे संस्थापक संदीपकुमार जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले की, मागील दोन्ही महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून रवींद्र बेडकिहाळ यांनीआम्हा सर्व तरुणांना या संस्थेच्या स्थापनेसाठी व कलारंग कला महोत्सवासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. आजच्या वर्धापन दिनानिमित्त कला महोत्सव कोरोना परिस्थीतीमुळे होऊ शकत नसला तरी औपचारिकरित्या होणाऱ्या तिसऱ्या महोत्सवाचेही अध्यक्षपद रवींद्र बेडकिहाळ यांनी भूषविले आणि या हॅट्रिक अध्यक्ष पदाबद्दल व त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती बद्दल आम्ही त्यांचा आज सत्कार करीत आहोत, असे सांगून मानपत्राचे वाचन केले.
प्रमुख पाहुणे डी. के. पवार यांच्या हस्ते अमृत महोत्सवी वर्षपूर्तीबाबत सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन बेडकीहाळ यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी एक झलक म्हणून गायक किशोर खुडे, गणेश नांदले ,सौ. काजल बहिरट यांनी सुमधुर हिंदी गीते व प्रसिद्ध कवी अविनाश चव्हाण यांनी सुरेख भावपुर्ण कविता सादर केली.
त्याला रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. यावेळी उषा राऊत, हेमंत जाधव, किरण शेवते, जितेंद्र कुंभार ,विजय जाधव, डॉ. संतोष भिसे, राजेश पवार व शंकर जठार या मान्यवरांसह रसिक आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव सुशांत चोरमले यांनी केले. तर महाराष्ट्र साहित्य परिषद फलटणचे कार्यवाह ताराचंद आवळे यांनी या महोत्सवावर आधारित कविता सादर करून आभार प्रदर्शन केले.