रविंद्र बेडकिहाळ यांना ‘जिद्द जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १८ ऑक्टोबर २०२२ । पुणे । मराठी पत्रकारांच्या कल्याणार्थ गेली 35 वर्षे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांना पुणे येथील आडकर फौंडेशनचा सन 2022 चा ‘जिद्द जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार, दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता पुणे येथील भारती विद्यापीठ भवन, मुख्य कार्यालयातील आठव्या मजल्यावरील सभागृहात भारती विद्यापीठ अभिमत्व विश्‍वविद्यालयाचे कुलगुरू व ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष व पुण्यातील साहित्य, संस्कृती व सामाजिक क्षेत्रातील जेष्ठ कार्यकर्ते अ‍ॅड. प्रमोद अडकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.

या समारंभासाठी सहकार व बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विश्‍वस्त विनोद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

रवींद्र बेडकीहाळ गेल्या 54 वर्षांपासून मराठी वृत्तपत्रसृष्टीत विविध राज्यस्तरीय वृत्तपत्रे व पत्रकारितेतील संस्थात्मक कार्यात कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील गरजू पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या आपद्ग्रस्त काळात तातडीने वैद्यकीय आर्थिक मदत आणि मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरणकार्य यासाठी त्यांनी 6 जानेवारी 1987 साली महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या स्वायत्त विश्‍वस्त संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 350 हून जास्त गरजू पत्रकार व त्यांचे कुटुंबीयांना मदत, आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे त्यांच्या पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) या जन्मगावी पहिल्या स्मारकाची उभारणी, राज्यातील महसूल विभागवार प्रत्येकी एक याप्रमाणे राज्यात दरवर्षी 6जानेवारी पत्रकार दिनानिमित्त 8 पत्रकारांना दर्पण पुरस्कार वितरण, आत्तापर्यंत 250 होऊन जास्त पत्रकार या पुरस्काराने सन्मानित, राज्यात विविध ठिकाणी पत्रकारांसाठी कार्यशाळा, ‘दर्पण’करांना केंद्र सरकार तर्फे आदरांजली म्हणून खास टपाल लिफाफ्याचे टपाल खात्यातर्फे प्रकाशन तसेच राज्य शासनातर्फे ‘दर्पण’ करांना अभिवादन म्हणून दरवर्षी 6 जानेवारी पत्रकार दिना दिवशी राज्यातील सर्व वृत्तपत्रांना विशेष अभिवादनच्या जाहिरातीचे वितरण, शासनातर्फे दरवर्षी बाळशास्त्री जांभेकर जयंती दिवशी 20 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातून अभिवादन, मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयात जांभेकर यांच्या तैलचित्राचे अनावरण,ज्येष्ठ निवृत्त संपादक पत्रकार यांना आयुष्याच्या संध्याकाळी दरमहा 11,000/- रुपये सन्मानाने मिळण्यासाठी राज्यशासनातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना सुरू करण्यात यशस्वी पुढाकार, जांभेकर यांचे राज्याच्या शैक्षणिक कार्यातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या नावाने पहिले शैक्षणिक स्मारक म्हणून फलटण जिल्हा सातारा येथे 1997 पासून आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय सुरू, पत्रकारांसाठी आरोग्य सुविधा इत्यादी अनेक विधायक उपक्रमांसाठी बेडकिहाळ सातत्याने आजही वयाच्या 78 व्या वर्षी कार्यरत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जेष्ठ कार्यकारी मंडळ सदस्य व सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत असून या माध्यमातून सातारा सांगली जिल्ह्यात त्यांनी नव्याने म.सा.प शाखा सुरु केल्या आहेत. फलटण येथे गेल्या दहा वर्षापासून यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. बेडकिहाळ यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना ‘जिद्द जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून मराठी वृत्तपत्र सृष्टीतील महत्त्वाच्या अशा या कार्यक्रमासाठी पत्रकारिता, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील हितचिंतकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन, आडकर फौंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रमोद आडकर यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!