कारवाईच्या भीतीने राऊत यांचे बेताल आरोप – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१७ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । आपले गैरव्यवहार उघडकीला येण्याची चिन्हे दिसू लागल्याने शिवसेना नेते संजय राऊत हे अस्वस्थ झाले असून या अस्वस्थतेमुळेच ते भाजपा नेत्यांवर बेताल आरोप करू लागले आहेत. असे प्रतिपादन केंद्रीय मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी केले.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते गणेश हाके या प्रसंगी उपस्थित होते. मुख्यमंत्री होण्याच्या महत्वाकांक्षेने पछाडलेल्या राऊत यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटविण्याची सुपारी घेतली आहे. असा आरोपही श्री.राणे यांनी केला.

श्री.राणे म्हणाले की, मोठा गाजावाजा करत राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेत त्यांना भाजप नेत्यांविरुद्ध सबळ पुराव्यानिशी आरोप करता आले नाहीत. राऊत यांनी पत्रकार परिषदेत बिनबुडाचे आरोप केले. राऊत यांच्याजवळ कोणाच्याही गैरव्यवहाराचे पुरावे असतील तर त्यांनी ते केंद्रीय तपास यंत्रणांच्या स्वाधीन करावेत.

प्रविण राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशी दरम्यान दिलेल्या जबाबामुळे संजय राऊत हे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. आपल्या गैरव्यवहारांची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागल्याने कारवाई होण्याची भीती त्यांच्या मनात आहे. या भीतीपोटी आलेल्या वैफल्यामुळे ते भाजपा नेत्यांवर असभ्य भाषेत आरोप करू लागले आहेत. सुजीत पाटकर यांच्या कंपनीत राऊत यांच्या कन्या संचालक कशा असा सवालही श्री.राणे यांनी केला.


Back to top button
Don`t copy text!