दैनिक स्थैर्य | दि. १७ जून २०२४ | फलटण |
मार्कांचे, पदव्यांचे ढीग वाढवण्यापेक्षा संस्काराची वाढ होण्याची गरज असून मुला-मुलींनी असं कोणतेही काम करता कामा नये की बापाला मान खाली घालावी लागेल. जिवंतपणीच मरण खूप वाईट असल्याचे प्रसिद्ध वक्ते प्रा. वसंतराव हंकारे यांनी स्पष्ट केले.
दुधेबावी ता. फलटण येथील दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठान आयोजित संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत प्रा. वसंतराव हंकारे बोलत होते. अध्यक्षस्थानी उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे होते.
प्राध्यापक वसंतराव हंकारे म्हणाले, ज्या घरातली माता आनंदी असते ते घर आनंदी असते. प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होता येत नाही. त्यामुळे मुक्त होता येत नसून मुक्त झाल्याशिवाय आनंद मिळत नाही. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्याचे ध्येय आनंद मिळणं हेच असले तरी दुःख असल्याशिवाय सुखालाही महत्व राहणार नसल्याचे प्रा. हंकारे यांनी निदर्शनास आणून दिले. आईच्या बापाच्या वेदना मुलांना कळाल्या पाहिजेत. ज्याला आईबाप कळतात, त्याला निश्चितपणे यश मिळते. शरीर आणि नैतिकतेला महत्व देण्याची काळाची गरज असून मुला-मुलींनी डॉक्टर, इंजिनिअर नाही झालं तरी चालेल पण चांगला माणूस घडला पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन प्रा. हंकारे यांनी केले.
उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे म्हणाले, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानची व्याख्यानमाला आम्हाला प्रेरणादायी ठरली असून सातत्यपूर्ण चालणारी व्याख्यानमाला समाजाला दिशादर्शक ठरत असून नवयुवकांना निश्चितच मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. गेली २४ वर्षे सातत्याने होत असलेली व्याख्यानमाला अधिकारी बनण्यासाठी समाजातला चांगला नागरिक घडण्यासाठी निश्चित फायदेशीर ठरत असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले.
प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ. राजश्री नाळे म्हणाल्या, ग्रामीण भागात होत असलेले प्रबोधन सकारात्मक परिवर्तनाला कारणीभूत ठरत असून सद्य:परिस्थितीत धकाधकीच्या युगात निश्चित मार्गदर्शक ठरत आहे. चांगले कार्य करणार्यांना प्रोत्साहन देण्याची प्रतिष्ठानची संकल्पना निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
यावेळी राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्काराने फलटणच्या प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ व समुपदेशक डॉ. राजश्री किरणकुमार नाळे यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई गिड्डे, रवींद्र कोलवडकर यांनी मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले. प्रास्ताविक सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर यांनी केले. सूत्रसंचालन व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष भांड यांनी केले.
उपस्थितांचे आभार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे यांनी व्यक्त केले. सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार दादासाहेब पवार, प्रतिष्ठानचे खजिनदार डॉक्टर युवराज एकळ, अॅडव्होकेट ऋषिकेश बिचुकले, भानुदास सोनवलकर, पोपटराव सोनवलकर, भीमराव नाळे, कृषी मित्र संजय सोनवलकर, तात्याबा सोनवलकर,सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय दडस, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाषराव सोनवलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.