स्वराज कारखान्याकडून एफआरपी पेक्षा जादा दर; कारखान्याकडून स्पष्टीकरण


दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२१ । फलटण । साखर आयुक्तालय पुणे यांचेकडील माहितीच्या आधारे बळीराजा संघटनेने काही वृत्तपत्र व ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्ये सातारा जिल्ह्यातील 5 साखर कारखान्यांबाबत बातमी प्रकाशित केली आहे. यामध्ये स्वराज इंडिया अ‍ॅग्रो लि; चा समावेश आहे. मात्र स्वराज इंडिया अ‍ॅग्रो लि; ने एफ.आर.पी. पेक्षा 25% रक्कम जादा म्हणजेच रु.2,600 प्रमाणे सर्व ऊस पुरवठा उत्पादकांना अदा केलेली आहे, असे स्पष्टीकरण स्वराज कारखाना व्यवस्थापनाकडून देण्यात आले.

रिलीज मेकॅनिझमनुसार केंद्र शासनाकडून साखर कारखान्यास एकाच वेळेस साखर विक्रीस परवानगी दिली जात नसून टप्प्या टप्प्याने (कोठा पद्धतीने) दिली जाते. त्यामुळे कारखान्यास साखर विक्री करणस सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागतो. साखर विक्री टप्प्याटप्प्याने करुन आलेले पैसे टप्प्याटप्प्याने शेतकर्यांना पूर्णत: अदा केलेले असून एकाही शेतकर्याचे ऊस बिल देणे बाकी नाही. 31 ऑगस्ट अखेर एफआर.पी. प्रमाणे शेतकर्यांचे 99% पेमेंट रक्कम देवून 16 सप्टेंबर अखेर 100% शेतकर्यांची ऊस बिले एफ.आर.पी. पेक्षा 25% जादा दराने म्हणजेच रु.2,600 प्रमाणे अदा करण्यात आली आहे. या वस्तुस्थितीनुसार वृत्तपत्रातील बातमीमध्ये कोणतेही तथ्य नाही. साखर आयुक्तालयास कोणीतरी खोटी माहिती देवून ऊस उत्पादक व जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा खोडसाळपणा केला आहे. या बाबतची वस्तुनिष्ठ सर्व माहिती कारखाना प्रशासकीय विभागामार्फत साखर आयुक्तालय, पुणे येथे सादर करणार असल्याचेही कारखाना व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!