फलटणमध्ये कामगार संघर्ष संघटना, आझाद समाज पार्टी व बहुजन समाजाच्या वतीने ‘रास्ता रोको’ आंदोलन


दैनिक स्थैर्य | दि. १२ जून २०२३ | फलटण |
कामगार संघर्ष संघटना तथा आझाद समाज पार्टी व सर्व बहुजन समाजाच्या वतीने फलटण शहरामधील नाना पाटील चौकात आज ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी व शेकडो समाजबांधव उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव खून प्रकरण, मुंबईतील माता सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहामध्ये झालेल्या हिना मेश्राम बलात्कार व खून प्रकरण तसेच सावकारकीच्या व्याजाच्या ३ हजार रूपयांसाठी रेणापूर येथे मातंग बांधव गिरीधर तपघाले यांची झालेली निर्घृण हत्या या तिन्ही प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

वरील प्रकरणातील भालेराव, मेश्राम व तपघाले या तिन्ही पीडित कुटुंबांना न्याय द्यावा, त्यांचे पुनर्वसन करावे, त्यांना आर्थिक मदत आणि संबंधित आरोपी यांना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी यासाठी कामगार संघर्ष संघटना तथा आझाद समाज पार्टी व सर्व बहुजन समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

या रास्ता रोको आंदोलनात कामगार संघर्ष संघटनेचे आणि आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष सनी घनशाम काकडे, मंगेश आवळे, महादेव गायकवाड, अमर झेंडे, सूरज भाईलुमे, सचिन अहिवळे सर, सुधीर अहिवळे, जय भय्या माने, सपना भोसले, रोहित अडागळे, राजू खाल्लारे, दिनेश अहिवळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!