राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे राष्ट्राच्या विकासात मोठे योगदान – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२३ । मुंबई । देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जे नेतृत्च लागते ते तयार करण्याची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत करण्यात येते. या योजनेच्या स्वयंसेवकांचे राष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यासाठी स्वयंसेवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन नेतृत्च गुणांचा विकास गरजेचे आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या वतीने नागपूर विद्यापीठातील सभागृहात पाच दिवसीय राज्यस्तरीय नेतृत्व गुणविकास शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले.

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दूधे, विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सोपानदेव पिसे, राज्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ब्रँड ॲम्बेसिडर नेहा पाठक तर दूरदृश्यप्रणालीद्वारे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी रामेश्वर कोठावळे यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आजच्या युवकांमध्ये आहे. भारतात  कौशल्य धारण केलेले सर्वाधिक गुणी विद्यार्थी आहेत.समाजाप्रती निष्ठा असणारा युवा वर्ग तयार करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होत आहे. युवकांनी पर्यावरण, कौशल्य विकास, ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासारख्या विषयांवर काम करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. प्रशासनाच्या बरोबरीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून काम व्हावे यासाठी संख्या वाढविणे निधी उपलब्ध करून देणे यासारखे सर्व सकारात्मक सहकार्य करण्याची ग्वाही श्री पाटील यांनी यावेळी दिली.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामुळे स्वच्छता, व्यक्तीमत्व विकास, नेतृत्व विकास, व्यावहारीक शिक्षण, जी-20 चे नेतृत्व, जगाचे नेतृत्व, आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक बांधीलकीची शिकवण स्वयंसेवकांना मिळणार असल्याचे रामेश्वर कोठावळे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास राज्यातील विविध महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठातले राष्ट्रीय सेवा योजनेचे निवडक विद्यार्थी सहभागी होते. हे शिबीर  दि. 13 ते 17 मार्च 2023  या कालावधीत  सुरू असणार आहे.


Back to top button
Don`t copy text!