
स्थैर्य, फलटण, दि. ०५ ऑगस्ट : कर्जत तालुक्यातील राशीन येथे ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक’ या नामफलकाची काही समाजकंटकांनी तोडफोड करून विटंबना केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद फलटण तालुक्यात उमटले असून, या निंदनीय कृत्याच्या निषेधार्थ आज विविध संघटनांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निदर्शने केली.
फलटण तालुका ओबीसी संघर्ष समिती, महात्मा फुले जयंती उत्सव समिती आणि तालुका मुस्लिम समाज यांच्या नेतृत्वाखाली शेकडो समाजबांधव एकत्र आले होते. त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना या घटनेसंदर्भात एक निवेदन सादर केले. यावेळी, पुरंदर तालुक्यातील वीर येथे ओबीसी युवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचाही तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला.
राशीन येथील नामफलकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना खपवून घेतले जाणार नाही, अन्यथा याचे गंभीर परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनाच्या वेळी बापूराव शिंदे, नंदकुमार नाळे, भाऊ गोविंद भुजबळ, मुनिष जाधव, पिंटू इवरे, आमिर शेख, दत्ता नाळे, विकास नाळे, संदीप नेवसे, रणजीत नाळे, अमोल रासकर, अमोल शिंदे, ऋषिकेश काशीद, डॉ. रणजित बनकर, बापूराव बनकर, बाळासाहेब ननावरे, ऋषिकेश शिंदे, बंडू शिंदे, शनेश शिंदे, रोहन शिंदे, प्रवीण फरांदे, विजय शिंदे, दीपक शिंदे, किरण राऊत, बाळासाहेब घनवट, किरण पखाले, शेखर शिंदे, ज्ञानेश्वर अडसूळ, प्रथमेश शिंदे, अजय भुजबळ, अमरदीप भुजबळ, रमेश नाळे, शिवाजी भुजबळ, प्रदीप ननवरे, योगेश शिंदे, तुषार करणे, रामदास शिंदे, दिनेश शिंदे, अभिजीत शिंदे, भीमराव जाधव, ऋतिक नानावरे, विक्रम पखाले आणि किरण जाधव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.