दैनिक स्थैर्य | दि. २४ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
फलटण परिसरात अत्यंत दुर्मिळ असा अल्बिनो (रंगदोष असलेला) साप लोकवसाहतीमध्ये आढळून आला.
यावेळी नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटणचे प्रतिनिधी व वन्यजीव रक्षक पंकज पखाले यांनी घटनास्थळी पोहचून पाहिले असता तो भारतीय चष्मेवाला नाग (इंडियन स्पेकटॅकल्ड कोब्रा) जातीचा अल्बिनो साप असल्याचे समजले व त्याचा रंग पूर्ण गुलाबी-पांढरट असा दिसून आला. या सापाला लोकवसाहतीतून सुरक्षितरित्या पकडून त्याची संस्थेत नोंद करण्यात आली व त्वरित त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
यावेळी संस्थेतर्फे पुढे माहिती देताना सांगण्यात आले की, अल्बिनिझम ही एक दुर्मिळ अनुवांशिक स्थिती आहे, जी उत्परिवर्तन किंवा बदलांमुळे उद्भवते, जी शरीरात तयार होणार्या मेलेनिनच्या प्रमाणात प्रभावित करते. मेलेनिन सापांमधे त्वचा, डोळ्यांचे रंगद्रव्य (रंग) नियंत्रित करते. अल्बिनिझम असलेल्या सापांची त्वचा व डोळे अत्यंत फिकट गुलाबी पांढरट असते. हा एक असा अनुवांशिक विकार आहे, जिथे कोणत्याही सजीवाचा जन्म नेहमीपेक्षा कमी मेलेनिन रंगद्रव्यासह होतो.
भविष्यात पुढेही असे दुर्मिळ सजीव आपल्याला पहायचे असतील तर आपण सर्वांनी मिळून सबंध वन्यजीवांना अभय देऊन त्यांचे संरक्षण केले पाहिजे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले.