कोरोनाचा प्रसार रोखण्याठी पालकमंत्री भरणे यांनी बैठकीत घेतला निर्णय
स्थैर्य, सोलापूर, दि. 25 : सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुमारे एक लाख नागरिकांची रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली. त्याचबरोबर शहरात तुर्तास लॉकडाऊन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ना. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज कोरोना प्रसाराला रोखण्यासाठी विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीनंतर ना. भरणे यांनी ही माहिती दिली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.
ना. भरणे यांनी सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करायचा का याबाबत सर्व अधिकाऱ्यांशी व्यापक चर्चा करुन सर्वांची मते जाणून घेतली. मात्र सोलापूर शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन न करण्याचा निर्णय चर्चेअंती घेण्यात आला, असे सांगितले.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यातून सुमारे एक लाख नागरिकांना इतर आजार (को-मॉर्बिड) असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व नागरिकांची दिवसांत रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करण्यात येणार आहे. या टेस्टमुळे संबंधित व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे किंवा नाही, याबाबतचा अहवाल अर्ध्या तासात मिळणार आहे. ही टेस्ट आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात येणार आहेत. तसेच ही टेस्ट करण्यासाठी पोलीस आयुक्तालय आणि महानगरपालिका एकत्रितरित्या आराखडा तयार करणार आहेत. यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाला विशेष मनुष्यबळ पुरविले जाईल,असे श्री.भरणे यांनी सांगितले.
टेस्टमध्ये पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांचे अलगीकरण केले जाणार असून त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी खंडीत करण्यात निश्चित यश येईल. या टेस्टसाठी जिल्हा प्रशासनाने महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन श्री.भरणे यांनी केले.
बैठकीस डॉ.वैश्यंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, गजानन गुरव, धनराज पांडे आदी उपस्थित होते.