गेल्या ३० वर्षांत जी कामे झाली नाहीत, ती आम्ही दोन वर्षांत केली : रणजितदादा; “ग्रामविकास मंत्री आपल्या पाठीशी, निधीची कमी पडणार नाही”


“गेल्या ३० वर्षांत जी कामे झाली नाहीत, ती आम्ही दोन वर्षांत केली. विरोधकांनी नावे ठेवण्यापेक्षा विकासाची स्पर्धा करावी,” माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विडणीत घणाघात. आमदार सचिन पाटील यांची कार्यपद्धती आणि जयकुमार गोरेंच्या निधीबाबत मोठे विधान. वाचा सविस्तर…

स्थैर्य, फलटण, दि. २४ जानेवारी : “फलटण तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून विरोधकांकडून सुरू असलेली टीका-टिप्पणी अतिशय दयनीय पातळीवर पोहोचली आहे. आमच्या नावाने बोटे मोडणे आणि शिव्याशाप देणे, हे एकच काम त्यांना उरले आहे. त्याऐवजी त्यांनी विकासकामे पूर्णत्वास नेण्याची स्पर्धा करायला हवी होती. त्यांनी ३० वर्षांत जी कामे केली नाहीत, ती कामे आम्ही आमचा विचारचा आमदार निवडून आल्यापासून अवघ्या एक-दोन वर्षांत करून दाखवली आहेत. आता जनता सुज्ञ झाली असून त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही,” असा घणाघात माजी खासदार तथा भाजप नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांनी केला.

फलटण तालुक्यातील विडणी (Vidni) येथे आयोजित महायुतीच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार सचिन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आमदार भेटायला ‘परवानगी’ची गरज नाही!

रणजितसिंह यांनी यावेळी आमदार सचिन पाटील (MLA Sachin Patil) यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. ते म्हणाले, “आत्ताचे आपले आमदार सचिन पाटील यांच्याकडे जाण्यासाठी किंवा त्यांना एखादे पत्र देण्यासाठी कोणालाही पूर्वपरवानगी घ्यावी लागत नाही. अगदी सामान्य कार्यकर्ताही थेट त्यांच्याकडे जाऊन कामे मार्गी लावू शकतो. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे जाण्यासाठी किंवा काम करून घेण्यासाठी माझी परवानगी घेण्याचीही गरज लागत नाही. त्यांचे दार जनतेसाठी सतत उघडे असते. गतवर्षापासून जनतेने हा बदल स्वीकारला आहे.”

विरोधकांचा पक्ष कोणता, हे त्यांनाच ठाऊक नाही!

विरोधकांच्या गोंधळलेल्या स्थितीवर बोट ठेवताना रणजितसिंह म्हणाले, “आपले विरोधक नेमके कोणत्या पक्षात आहेत आणि त्यांचा नेता कोण आहे, हे आता त्यांना स्वतःलाच माहित नसावे. बाहेरच्या नेत्यांना फलटणमध्ये आणून आमच्या विरोधात बोलायला लावण्यापेक्षा, त्या नेत्यांकडून तालुक्यासाठी विकासकामे मंजूर करून घेतली असती तर बरे झाले असते. पण त्यांनी फक्त नावे ठेवण्यातच आपली वर्षे घालवली.”

ग्रामविकास मंत्री पाठीशी; निधीची गंगा येणार!

निवडणुकीचे महत्त्व विशद करताना ते म्हणाले, “आता होत असलेल्या निवडणुका या ग्रामविकास खात्याच्या (Rural Development Department) अंतर्गत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे सर्व या खात्याच्या अखत्यारीत येते. सुदैवाने राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांनी गेल्या अवघ्या तीन महिन्यांत फलटण तालुक्यासाठी २०० कोटींहून अधिक निधी दिला आहे. जर आपण जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागांवर भाजपचा झेंडा फडकवला, तर ते विशेष निधी मंजूर करून देणार आहेत. त्यामुळे विकासासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहा.”

विडणी-सांगवीचा कायापालट : आ. सचिन पाटील

यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील यांनी विडणी जिल्हा परिषद गटासह विडणी व सांगवी पंचायत समिती गणामध्ये गेल्या वर्षभरात केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा मांडला आणि यापुढील काळातही विकासाची ही गती अशीच ठेवणार असल्याची ग्वाही दिली.


Back to top button
Don`t copy text!