
माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी १९ फेब्रुवारी रोजी असणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे त्यांनी हा संवेदनशील निर्णय घेत कार्यकर्त्यांना फलकबाजी न करण्याचे आवाहन केले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 19 फेब्रुवारी : माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपला आज (दि. १९ फेब्रुवारी) होणारा वाढदिवस साजरा न करण्याचा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच निधन झाल्याने, त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून आणि दुखवटा पाळण्यासाठी रणजितसिंह यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा १९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस असतो. दरवर्षी फलटण आणि माढा मतदारसंघात हा दिवस कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात ‘सेवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. मात्र, यंदा राज्यावर ओढवलेल्या शोककळेमुळे त्यांनी हा उत्सव टाळला आहे. याबाबत त्यांनी एक ‘नम्र आवाहन’ करणारे पत्रकच सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध केले आहे.
प्रसिद्ध केलेल्या पत्रकात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या निधनामुळे मी यावर्षी माझा वाढदिवस (१९ फेब्रुवारी २०२६) साजरा करणार नाही. तसेच, एका कौटुंबिक कार्यक्रमामुळे मी बाहेरगावी असणार आहे.”
आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले होते, मात्र रणजितदादांनी त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. “सर्व सहकारी कार्यकर्ते, मित्रपरिवार व हितचिंतक यांनी कोणत्याही प्रकारचे वाढदिवसाचे कार्यक्रम किंवा सत्कार समारंभ आयोजित करू नयेत, ही नम्र विनंती. या प्रसंगी आपण सर्वांनी दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचा आदर्श जपूया,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
एका ज्येष्ठ नेत्याच्या जाण्याने दुखवटा पाळत, वाढदिवस रद्द करण्याच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांतून कौतुक होत आहे.

