रणजितदादांचा ‘लाईव्ह’ दणका! भर सभेमध्ये थेट मंत्र्यांना फोन लावून पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी मिळवले १५ कोटी; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नूतन सभापतींचा पदभार!


स्थैर्य, फलटण, दि. 19 मार्च : नेत्याची खरी ताकद ही त्याच्या शब्दांत आणि त्याच्या दिल्ली-मुंबईतील वजनात असते, याचा प्रत्यक्ष अनुभव आज फलटणकरांनी पुन्हा एकदा घेतला. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर फलटण पंचायत समितीच्या नूतन सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांच्या पदग्रहण समारंभात माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अक्षरशः विकासाची ‘गुढी’च उभारली. भर कार्यक्रमात त्यांनी थेट राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना फोन लावला आणि पाहता-पाहता पंचायत समितीच्या नवीन आणि अद्ययावत इमारतीसाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला!

या दिमाखदार सोहळ्याला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह पंचायत समितीचे सर्व सदस्य आणि आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रणजितदादांचा ‘मास्टरस्ट्रोक’: ३० दिवसांत नव्या इमारतीची मान्यता, १५ कोटींचा निधी!

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते रणजितदादांचे आक्रमक आणि ‘व्हिजनरी’ भाषण. “गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर फलटण पंचायत समितीचे रुपडे पालटण्याचा संकल्प आपण केला आहे,” असे सांगत रणजितदादांनी मोठी घोषणा केली. आमदार सचिन पाटील यांनी नुकत्याच आणलेल्या ९३ कोटींच्या घसघशीत निधीचे कौतुक करत दादा म्हणाले, “आमदार सचिन पाटलांच्या काळात तालुक्याला निधी कमी पडलेला नाही.”

सध्याच्या पंचायत समिती इमारतीची दुरवस्था पाहता, येत्या ३० दिवसांत पंचायत समितीसाठी एक अत्यंत देखणी आणि विस्तारित नवीन इमारत मंजूर करून आणण्याचा शब्द त्यांनी दिला. विशेष म्हणजे, या नवीन वास्तूत ग्रामसेवकांसाठीही हक्काची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

भर सभेतून थेट ग्रामविकास मंत्र्यांना फोन!

“येत्या महिन्यात या नव्या इमारतीचे भूमिपूजन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करू,” असे सांगत रणजितदादांनी एका क्षणाचाही विलंब न लावता, थेट व्यासपीठावरूनच मंत्री जयकुमार गोरे यांना फोन लावला. रणजितदादा आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील घट्ट मैत्रीची प्रचिती यावेळी आली. दादांनी या इमारतीला मंजुरी देण्याची विनंती करताच, मंत्री महोदयांनी ३१ मार्चच्या आतच या इमारतीसाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे भर सभेत आश्वासित केले! एका फोनवर १५ कोटींचा निधी मंजूर झाल्याचे पाहून संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

“शेतकऱ्यांना न्याय देणार, निधीची कमतरता भासू देणार नाही” – आमदार सचिन पाटील

यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील यांनी नूतन सभापतींचे कौतुक केले. “नूतन सभापती अतिशय धडाडीने काम करतील आणि पंचायत समितीच्या कामकाजाचा एक नवा आदर्श प्रस्थापित करतील. तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी निधी उपलब्ध करून देऊ,” असा शब्द आमदार सचिन पाटील यांनी दिला.

“सर्वांना सोबत घेऊन काम करणार” – सभापती शिवांजली भोसले

पदभार स्वीकारल्यानंतर नूतन सभापती शिवांजली भोसले यांनी अत्यंत विचार मांडले. “मी कोणत्याही एका समाजाची नाही, तर संपूर्ण तालुक्याची आणि सर्वांची सभापती म्हणून काम करणार आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली. रणजितदादा आणि आमदार सचिन पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली तालुक्याचा विकास करणार असल्याचे सांगतानाच, “पुढील ६ महिन्यांनंतर शुभांगी शिंदे या सभापती पदाचा कार्यभार स्वीकारतील,” हे त्यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!