रणजितदादा : दमदार खासदार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, फलटण, दि. १९ : माढा लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवून खासदार म्हणून निवडून आलेले फलटणचे सुपुत्र रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा आज 19 फेब्रुवारी रोजी वाढदिवस ! सुरुवातीला राष्ट्रीय काँग्रेसमध्ये असले तरी आक्रमक नेता म्हणून ओळख असलेले रणजितदादा लोकसभा निवडणूकीत निवडून आल्यापासून नुसते खासदार  राहिले नसून आपल्या कामांच्या जोरावर ‘दमदार खासदार’ म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर राजकारणातील दिग्गजांना टक्कर देत रेल्वे आणि पाणी हे दोन प्रश्‍न त्यांनी ज्या तडफेने हाती घेतले आणि सोडवून दाखवले; यातच त्यांचे दमदारपण सिद्ध झाले आहे.

नुसती सत्ता असून किंवा सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी असून चालत नाही तर सत्तेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात विकास कसा साधायचा याचे उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला खा.रणजितदादांकडे पाहता येईल. ‘फलटणची रेल्वे’ हा खर तर तालुक्यातील लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय. दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी लोणंद-फलटण-बारामती रेल्वे मार्गासाठी प्रचंड संघर्ष केला, त्यांच्या प्रयत्नातून लोणंद ते फलटण रेल्वे मार्ग तयार झाला, त्यानंतर माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून लोणंदहून फलटणला प्रत्यक्ष रेल्वे सुरु झाली. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गासाठी त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरु केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे या रेल्वे मार्गासाठी वारंवार पाठपुरावा केला. त्याचेच फलित म्हणून या रेल्वे मार्गासाठी सुमारे 1400 कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार करुन त्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये केंद्राने 700 व राज्य सरकारने 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी, असे नियोजन करण्यात आले आहे.

तसेच फलटण – पुणे या रेल्वेसाठी खासदार रणजितदादांनी विशेष प्रयत्न व सातत्याने पाठपुरावा करुन येत्या महिन्याभरात ही रेल्वे सुरु होणार असल्याचे संकेत नुकतेच केंद्रीय रेल्वेमंत्री ना.पियुष गोयल यांनी दिले आहेत. यानिमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्‍न सुटणार असून फलटणकरांच्या स्वप्नातील रेल्वे खासदार रणजितदादांनी लोकसभेत गेल्यापासून अवघ्या एक – दीड वर्षाच्या कालावधीतच प्रत्यक्षात उतरवून दाखवली आहे.
नीरा देवघरच्या पाणी वाटपातील फलटण तालुक्यावर होणारा अन्याय देखील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मोठ्या धडाडीने दूर केला होता. रणजितदादांच्या या कामगिरीची चर्चा केवळ तालुक्यात किंवा लोकसभा मतदारसंघापूरती मर्यादित न राहता संपूर्ण देशात चांगलीच रंगली होती. मात्र दुर्दैवाने राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मोठ्या संघर्षातून रणजितदादांनी घडवून आणलेला पाणी वाटपाचा ऐतिहासिक निर्णय विद्यमान राज्यसरकारने पुन्हा बदलला. मात्र; शेतकर्‍यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नावर केंद्र सरकारच्या माध्यमातून आजही खासदार रणजितदादा न्याय्य पाणीवाटपासाठी प्रयत्न करीत आहेत.

महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असलेल्या कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या माध्यमातून राज्यातील बहुतांश भाग ओलिताखाली येणार आहे, यातील बराचसा भाग आपल्या माढा लोकसभा मतदार संघात येतो म्हणूनच ही योजना देखील पूर्ण करण्याच्यादृष्टीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मोठ्या तडफेने प्रयत्नशील आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खासदार रणजितदादांनी फलटण तालुक्यासह संपूर्ण माढा मतदारसंघाचा कायापालट करण्याचा निर्धार केलेला आहे. त्याला कार्यकर्त्यांचीही साथ मिळत असून कार्यकर्त्यांची मोठी फळी खासदार गटाच्या माध्यमातून उभारली जात आहे. त्यांना या कामामध्ये बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर व सुविद्य पत्नी अ‍ॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, आमदार, पदाधिकारी यांची साथ मिळत आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ही राजकीय घोडदौड अशीच यशस्वी होत राहो आणि त्यांच्या धडाडीने फलटण शहर व तालुक्यासह संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात विकासकामे आणखीन गतीशील होवोत याच वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा !


Back to top button
Don`t copy text!