दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । सातारा । जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आज सर्वसामान्य कुटुंबातील ज्ञानदेव रांजणे यांनी विजय मिळवून इतिहास निर्माण केला आहे. रांजणे यांचा हा विजय जावळी तालुक्यातील दहशत, गुंडगिरीवर मिळवलेला विजय असून रांजणे हे संचालक झाल्याने जावळी तालुक्याला हक्काचा संचालक जिल्हा बँकेत मिळाला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जावळी तालुक्यात विजय मिळवून दादागिरीचं राजकारण हद्दपार करू, असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
मेढा येथे मानकुमरे पॉईंटवर जिल्हा बँकेवर निवडून आल्याबद्दल रांजणे यांचा सत्कार आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषद सदस्य अर्चना रांजणे, माजी सभापती अरुणा शिर्के, नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, मालोजीराव शिंदे, अॅड. शिवाजीराव मर्ढेकर, रवींद्र परामने, तुकाराम धनावडे, मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, कांतिभाई देशमुख, जयश्री मानकुमरे, जयदीप शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली.