दैनिक स्थैर्य |दि. १० नोव्हेंबर २०२१| फलटण | सध्या सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. आज जिल्हा निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख होती. शेवटच्या दिवशी विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यासोबतच अनिल देसाई यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवड झालेली आहे. यांच्या विरोधात असलेले अर्ज मागे घेण्यात आले आहेत.
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले व महानंदचे उपाध्यक्ष ज्ञानदेव उर्फ डिके पवार हे रिंगणात होते. परंतु अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी यांनी अर्ज माघारी घेतल्याने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवड झालेली आहे.
माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मजूर सहकारी संस्था या गटामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. परंतु शेवटच्या दिवशी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अर्ज माघार घेतल्याने अनिल देसाई यांची या मतदारसंघांमधून बिनविरोध निवड झालेली आहे.