
विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 18 मार्च : विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा मोठा आणि भावनिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असून, आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना “शुभेच्छा जाहिराती फलक नकोत व कार्यक्रम घेऊ नयेत” असे अत्यंत नम्र आणि स्पष्ट आवाहन त्यांनी केले आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप (WhatsApp) स्टेटसच्या माध्यमातून हा संदेश सर्व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला आहे. राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः सातारा जिल्हा व फलटण तालुक्यात श्रीमंत रामराजे यांचा मोठा चाहतावर्ग आणि समर्थक आहेत. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त फलटणसह संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे निधन झाल्याने संपूर्ण राज्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठी शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर, अजितदादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करत श्रीमंत रामराजे यांनी यंदा वाढदिवसाचा कोणताही सोहळा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप संदेशात कार्यकर्त्यांना उद्देशून स्पष्टपणे म्हटले आहे की, “महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या निधनामुळे मी या वर्षीचा वाढदिवस साजरा करणार नाही. सर्व कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना विनंती की कोणतेही प्रकारचे वाढदिवसाचे कार्यक्रम, शुभेच्छा फलक किंवा सत्कार आयोजित करू नयेत, ही नम्र विनंती.”
रामराजे नाईक निंबाळकर यांच्या या स्पष्ट आवाहनामुळे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसाचे सर्व नियोजित कार्यक्रम आणि सत्कार सोहळे रद्द केले आहेत. तसेच लावले जाणारे शुभेच्छांचे फलकही न लावण्याचा निर्णय रामराजे समर्थकांनी घेतला आहे.
