दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । फलटण । प्रसन्न रूद्रभटे । विधान परिषदेचे माजी सभापती व सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आता देशाच्या राजकारणात होणार असल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. त्याचे कारणही तसेच आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय अध्यक्षपदी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुन्हा निवड करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय वर्किंग कमिटी मध्ये विधान परिषदेचे माजी सभापती, सातारा जिल्ह्याचे नेते व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आलेली आहे.
आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपली राष्ट्रीय रणनीती पूर्णपणे बदललेली दिसत आहे. त्यामुळे राज्यातील हुशार व जाणत्या नेत्यांना राष्ट्रीय कमिटीवर स्थान देण्याचे काम चालू असल्याचे दिसत आहे. या सोबतच आता राज्यानंतर देशाच्या राजकारणामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे ऍक्टिव्ह होणार असल्याचे दिसून येत आहे.
राज्यामध्ये काम करत असताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्याच्या राजकारणामध्ये आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे. अपक्ष आमदारापासून राज्याच्या राजकारणामध्ये सुरू झालेला प्रवास विधानपरिषद सभापती पर्यंत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेला आहे. त्यांना विविध मंत्री पदाचा सुध्दा अनुभव आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कमिटीवर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची निवड झाल्याने आगामी काळामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे देशाच्या राजकारणामध्ये ॲक्टिव्ह होणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे.