दैनिक स्थैर्य । दि. २९ मे २०२२ । फलटण । सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील मायणी येथे असणार्या मेडीकल कॉलेजमध्ये झालेल्या गैरव्यवहारात पोलीसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये आमचे नेते व विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा दुरान्वयानेही संबंध नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ निकम यांनी दिलेले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माण – खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी नुकतीच सातारा येथे पत्रकार परिषद घेवुन मायणी येथे असलेल्या मेडीकल कॉलेजमध्ये गैरव्यवहार झाल्या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामागे विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्याला प्रतिउत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ निकम बोलत होते.
मायणी सारख्या एका छोट्या गावात असलेल्या मेडिकल कॉलेज मधील गैव्यवहारप्रकरणी आणि आर्थिक घोटळा या संबंधित सदर कॉलेज मधील आजी आणि माजी ट्रस्टी यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत. कॉलेजमध्ये कोण काय करतेय या विषयी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा काडीमात्र संबंध नाही, असेही निकम यांनी स्पष्ट केले.
सध्या राज्यात काहीही घडले की त्याला खा. शरद पवार व सातारा जिल्हयात काही घडले की त्याला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनाच विरोधक जबाबदार धरतात. आता राहिला प्रश्न भविष्यात येणाऱ्या निवडणुकांचा तर ते सातारा जिल्ह्यातील सर्व निवडणुका आम्ही विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत व जिंकणार सुध्दा आहोत. जिल्ह्यात घडणार्या घटनांबद्दल विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनाच जबाबदार धरणे विरोधकांनी बंद करावे व विकासाच्या दृष्टीने कामकाज करावे, असा टोलाही निकम यांनी यावेळी लगावला.