कमिन्समधील सोळा हजार पैकी आठ हजार रूपये रामराजे खातात : खासदार रणजितसिंह


दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील एमआयडीसीमध्ये असणाऱ्या कमिन्स या कंपनीमध्ये जी मुले काम करत आहेत. त्यांच्या पगारामधील आठ हजार रुपये रामराजे खातात. आगामी काळामध्ये ज्याला कुणाला खुमखुमी आहे त्यांनी माझ्या विरोधात लोकसभा किंवा माण तालुक्यात जावून विधानसभा लढवा व जिंकून दाखवा असा घणाघाती आरोप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर केला.

फलटण येथे भारतीय जनता पार्टीच्या संवाद यात्रेच्या सांगता सभेत खासदार निंबाळकर बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जिल्हा, तालुका व शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझाच एक कार्यकर्ता फोडुन त्याच्या माध्यमातून माझ्यावर तीस केस दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु एकही केस नोंदवली गेली नाही. माझ्या विरोधात कितीही तक्रारी केस दाखल केल्या तरी मी भीत नाही, कारण स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा मुलगा आहे. त्यांचेच रक्त माझ्या धमन्यात आहे. परंतु माझ्या पत्नीच्या विरोधात त्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तो सुद्धा यशस्वी झाला नाही. रामराजे नेहमीच असल्या बोगस तक्रारी दाखल करत आलेले आहेत. यावेळी संजीवराजेंनी सुध्दा त्या कार्यकर्ताला त्यांच्या संस्थेच्या द्वारे ताकद देण्याची काम केले, असे यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

आगामी काळामध्ये फलटण नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवल्या शिवाय राहणार नाही. गेल्या तीस वर्षात दहशतवादी, गुडांना नगरसेवक करण्याचे काम सत्ताधारी मंडळींनी केले. गुंडगीरी करणारे ह्यांना का आवडतात ? हे आता शोधावे लागणार आहे. ह्यांच्या पुढच्या सातशे पिढ्या आल्या तरी एवढा निधी हे आणू शकत नाही, तेवढा निधी मी खासदार झाल्यावर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणला आहे. सत्तेतुन बाहेर पडल्याने भाजपात येण्याची यांची तडफड सुरु होती. परंतु ती सुद्धा यशस्वी झाली नाही. असे यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

शिंदे डेव्हलपरचे सर्व पैसे बाहेर काढून निवडणुका लढल्या तरी आता निवडणूक तुम्ही जिंकणार नाही. तालुक्यात बोगस नारळ आता ह्या पुढे तुम्ही फोडू शकत नाही. म्हातारपणात हाफचडीवर रामराजेंना आत बसवू शकतो, परंतु असे संस्कार आमच्यावर नाहीत. जयाभाउंचा सल्ला ऐकुन आता नातींसोबत आहात तर नातीच्या सोबतच रहा. रामराजेंचे कतृत्व काय ? तालुक्यातील मालोजी बॅंक पतसंस्थेला चालवायला दिली आहे, दुध संघाची काय अवस्था आहे सर्वांना माहित आहे. कारखाना त्या इचलकरंजीच्या जवाहर वाल्याना चालवायला दिला आहे. आता तालुक्यात बदलाची सुरवात झाली आहे. आगामी काळामध्ये म्हणजे पुढचे पंधरा वर्षे आपण प्रस्तावित केलेली कामच होणार आहे, असे यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

गेले दोन दिवस फलटण तालुक्याचा गण निहाय दौरा केला आहे. तालुक्यात बर्याच अडीअडचणी आहेत. शहरातील दवाखाने सर्व डेंग्यूमुळे फुल आहेत. लंपी बाधित जनावरे तालुक्यात जास्त प्रमाणात आढळत आहेत. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात प्रशासनात व जनतेत मोठा दुरावा निर्माण झालेला आहे. जेवढ्या अडीअडचणी तालुक्यात आहेत. त्या पैकी जास्तीत जास्त अडचणी सोडवण्याचे काम आम्ही करणार आहोत. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामांचे आपण मार्गी लावली आहेत. पुणे ते बेंगलोर हा नवीन हरित महामार्ग फलटण तालुक्यातील कोणत्याही दुसर्या महामार्गाला टच न करता फलटणवरून जाणार आहे. यासोबतच बुलेट ट्रेनचे तांत्रिक मान्यता मिळाली आहे. फलटणमधुन विमान उडताना बघायची आहे. फलटण ते मुंबई ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. या पाच वर्षात दोन ते चार लाख कोटींची कामे माढा लोकसभा मतदारसंघात करणार आहे, असे यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!