दरवर्षी मोठ्या हर्षोउल्हासात साजरा होणारा रमजान ईद चा सण यावर्षी मात्र कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सर्वांनीच केले आहे.
मुस्लीम धर्मात दोन महत्त्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईद उल जुहा. ईद उल फितर हा सण म्हणजे आनंद साजरा करण्यारी ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. याउलट ईद उल जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते. ईद उल फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. तर फितर म्हणजे दान करणे. अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. फितर हा मुस्लीम शरियत कायद्यातील मापदंड आहे. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईद हा आनंदाचा सण असल्याने ईदच्या दिवसांमध्ये मुस्लीम बांधवांच्या चेह-यावर आनंद खुललेला दिसतो. ईदला नवीन वस्त्रे परिधान करून मुस्लीम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लीम बांधव एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात.
रमजान महिन्यातील रोजा आणि नमाजाची पद्धत ही प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यापूर्वी सुमारे अडीच हजार वर्षापासून होती. मात्र त्याला नियम आणि पद्धत नव्हती. परंतु प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी नमाज आणि रोजा यासाठी काही विशिष्ट नियम घालून दिले. याचीच अंमलबजावणी आज जगातील सर्व मुस्लीम करतात. मुस्लीम धर्माच्या कुराण या पवित्र ग्रंथामधील सुरत क्रमांक 2 आणि आयात क्रमांक 183 मध्ये नमाज आणि रोजे हे स्वत:साठी व पूर्वजांसाठी लागू होतात, असा उल्लेख आहे. रमजान महिन्यात मुस्लीम समाजात सर्व वातावरण भक्तिमय झालेले असते. संपूर्ण महिन्याचे रोजे केल्याने ईश्वरमय जबाबदारीची जाणीव होऊन मन शुद्धीकरण होते आणि मन संयमी, धैर्यवान होऊन जीवनातील उत्साह वाढीस लागतो. पवित्र अशा रमजान महिन्याच्या उपवासाची सांगता रमजान ईदने होते. रमजान ईद हा मुस्लीम धर्मियांतील अत्यंत पवित्र सण म्हणून साजरा केला जातो. रमजानचा पवित्र आणि शुभ महिना संपल्यानंतर चंद्रदर्शन होताच शौव्वाल या महिन्याची पहिली तारीख सुरू होते आणि हा दिवस रमजान ईद नावाने साजरा केला जातो. शौव्वालची चंद्रकोर एकीकडे ईद-उल-फितरच्या आनंदाची ग्वाही देते, तर दुसरीकडे रमजानचे रोजे संपल्याचे सांगते. हा सण म्हणजे रमजान उपवासाचे पारणे असते. पहिल्या दिवशी हे पारणे करायचे असते. या ईदला लहान ईद म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी मोठया प्रमाणावर दानधर्म केला जातो. या दानधर्माला ईदुस्सदका असेही नाव आहे. रमजान महिन्यात अल्लाहने कुराण अवतरित केले. म्हणूनच या महिन्यात रोजाला महत्त्व प्राप्त झाले. उपवासामुळे शरीरिक स्वास्थ्यासह आध्यात्मिक लाभही होतो. आचार-विचार सुधारण्यासाठी रोजा करणे चांगले साधन असून पापापासून रक्षण करणारी ढाल आणि विकारांवर घाव घालणारी तलवार आहे. रमजान काळात शुद्ध हेतूने रोजे पाळणा-याला क्षमा मिळते. रोजा म्हणजे केवळ अन्न आणि पाणी यांचा त्याग नव्हे, तर वाईट आचार- विचारांपासून दूर राहणे असाही उद्देश आहे. वाईट पाहू नये, खोटे बोलू नये, कष्टाचे खावे आदी नियम रोजा काळात बंधनकारक आहेत. ईश्वरावरील श्रद्धा अधिक दृढ बनते, रमजान महिना म्हणजे सत्कृत्य करण्याचा, धर्माचरण करण्याचा स्वत:मध्ये विधायक बदल घडवून आपणास औदार्य वाढविणारा काळ आहे. रमजान महिन्यातले शेवटचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. या 10 दिवसांत अल्लाहच्या कृपांचा वर्षाव होतो. पुढच्या दहा दिवसांत कृपावंत, दयाळू अल्लाह आपल्या भरकटलेल्या, अपराधी, गुन्हेगार दासांना क्षमायाचनेनुसार क्षमा करतो. शेवटच्या दहा दिवसांत अल्लाह आपल्या आज्ञाधारक, उपासक बंद्यांसाठी मोक्षाचा निर्णय घेतो. हा महिना मुस्लिमांसाठी पुण्यसंचयाचा महिना असतो.ईदच्या दिवशी सकाळी प्रार्थना झाल्यानंतर प्रथम दहिभात आणि साखर यांचे जेवण होते. त्याचवेळी खारका खाण्याचीही पद्धत आहे. कारण मोहम्मद पैगंबर व त्यांच्या कुटुंबातील लोकांना हाच पदार्थ मुख्यत्वे उपलब्ध होता, अशी समजूत आहे. दुधात शेवया टाकून खीर खाण्याची आणि इतरांना खाऊ घालण्याचीही पद्धत आहे. या वेळी मिठाई आणि शिरखुर्मादी आवर्जून दिली जातात. ईदच्या दिवशी मुस्लीम धर्मातील महिलावर्गात मोठा उत्साह दिसून येतो. पहिल्या-दुस-या रोजापासून घरात त्या शेवया तयार करायला सुरुवात करतात. मात्र, हे चित्र आता केवळ ग्रामीण भागातच दिसते. शहरी भागात सगळ्याच गोष्टी रेडीमेड मिळायला लागल्या आहेत. ईदला आपल्या घराला रंगरंगोटी करून आप्तजनांना आपल्याकडे शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित केले जाते. ईदच्या शुभ पर्वाला गरीब, अनाथ मुस्लीम बांधव आनंदापासून वंचित राहत असेल, तर ती ईद मुस्लीम धर्मासाठी आनंदाची नाही, असे मानले जाते. मुस्लीम धर्मातील तळागाळातील व्यक्तीला ईदच्या पावन पर्वाचा आनंद घेता यावा, यासाठी जकात व फितराची तरतूद मुस्लीम शरीयत कायद्यामध्ये करण्यात आली आहे. जकात हे ईदच्या आधी दिले जाते. कारण त्यांनीही या वर्षातून एकदा येणा-या महान पर्व, ईदचा आनंद लुटता यावा. समाजात परस्परांविषयी बंधुभाव निर्माण व्हावा, राष्ट्रीय एकात्मता, अखंडता कायम राहावी यासाठी ही रमजान ईद साजरी केली जाते. अशा या रमजान ईदनिमित सर्व मुस्लीम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!