‘जय श्रीराम ,जय जय राम..’च्या जयघोषात जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी


सातारा – श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळेत श्रीरामाचा जन्मकाळावेळी पाळणा म्हणताना सुवासिनींनी. (छाया – अतुल देशपांडे)

स्थैर्य, 26 मार्च, सातारा : चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला दुपारी बारा वाजता जिल्ह्यातील विविध श्रीराम मंदिरात प्रभू श्री रामचंद्र की जय ,जय श्रीराम जय घोषात जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला…प्रभू श्रीरामचंद्र की जय, सीतापति रामचंद्र की जय, जय श्रीराम ..अशा मोठमोठ्या रामनामाच्या घोषणांनी यावेळी मंदिर परिसर दुमदुमून गेले होते .दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान साजरा होणार्‍या राम नवरात्राची सांगता आज झाली. दुपारी बारा वाजताजन्म काळावर विविध मंदिरांमध्ये पाळण्यामध्ये श्रीफळ रूपी ठेवलेल्या श्रीरामाचा जन्म करून त्याला सुवासिनींनी पाळणा व अंगाई गीते म्हणत जोजविले .
सातारा येथील चिमणपूरा पेठेतील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळेत गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान सुरू असलेले श्री राम यज्ञाची सांगता सकाळी आठ ते एक या वेळेत शांतिसुक्त पठण आवाहन देवतांचे पूजन अग्नी ध्यान प्रभू श्री रामचंद्राचे प्रित्यर्थ पुरुष सूक्त स्वाहाकार श्री राम नाम हवन ,उत्तरांग हवन बलिदान यज्ञाची पूर्णाहुतीने करण्यात आली .यावेळी ह.भ.प.वेदिका विवेक गोडबोले -काळे यांनी जन्म काळाचे किर्तन सादर केले. त्यानंतर महाआरती व जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर रामनवमीला सायंकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. जन्मकाळ सुरू असताना बाल श्रीरामाला पाळण्यात जोजवत महिलांनी पाळणा गीते म्हटली. आणि गुलाल व फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला .हा जन्मोत्सव साजरा करत असतानाच विविध मंदिरांमध्ये महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले होते .

सातारा शहरातील गेंडामाळ- शाहूपुरी परिसरातील श्रीराम ध्यान मंदिरात रामनवमीनिमित्त यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते. दुपारी रामनाम म्हणत जन्म काळाचे वेळी फुलांची पुष्पवृष्टी करून सायंकाळी कथक नृत्यलयाच्या वतीने कथक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.

प्रतापगंज पेठेतील श्रीगोरा राम मंदिरात जन्म काळानिमित्त सुश्राव्य कीर्तन सादर झाले. यावेळी राम जन्माचा सोहळा उपस्थित शेकडो सातारांपुढे वर्णन करताना पाळण्यात बाल श्रीरामला घालून महिलांनी अंगाई व पाळणा गीते म्हटली .त्यानंतर फुलांनी सजवलेल्या चांदीच्या पालखीतून श्रीरामाची शोभायात्रा व पालखी सेवा मंदिर परिसरात काढण्यात आली .

यावेळी गोरा राम मंदिर ट्रस्ट आणि अगटे परिवाराच्यावतीने बालाजी ब्लड बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये परिसरातील 100 हून अधिक कार्यकर्त्यांनी रक्तदानाचा एक चांगला उपक्रम संपन्न केला.सकाळी दहा ते सायंकाळी 5 दरम्यान हा रक्तदान महायज्ञ यावेळी सुरू होता. दरम्यान श्रीराम नवरात्रातील महाअष्टमीनिमित्त वेदमूर्ती बोरीकर गुरुजी यांनी मंगळवारी मंदिर परिसरात दुपारी श्रीराम यज्ञ संपन्न केला सातारा जिल्ह्यातील शहरातील काळाराम मंदिर मंगळवार पेठ परिसरात तसेच शाहूपुरी- गेंडामाळ परिसरातील राम मंदिर शनिवार पेठेतील श्री शहाराम मंदिर, फुटका तलाव परिसरातील माटे राम मंदिर तसेच श्री क्षेत्र सज्जनगड येथील श्री रामदास स्वामींचे समाधी मंदिरातही श्रीरामाचा जन्म दुपारी बारा वाजता संपन्न करण्यात आला .

आज रामनवमीला श्री समर्थांची जयंती उत्सव ही साजरा होतो .या निमित्त मंदिरातील समाधीला विशेष फुलांची सजावट करण्यात आली होती. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या समाधी असलेल्या श्रीक्षेत्र गोंदवले येथे श्री थोरले राम मंदिर आणि श्री धाकटे राम मंदिर आणि समाधी मंदिरातही हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला .सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर मार्गावरील माण तालुक्यातील वावरहिरे या गावीही हनुमंत महाराजांनी स्थापन केलेल्या श्रीराम मंदिरात झालेल्या जन्मोत्सवासाठी परिसरातील तसेच तालुक्यातील हजारो राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील फलटण संस्थांमध्येही नाईक निंबाळकर घराण्याच्या श्रीराम मंदिरात हा जन्म उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला .यावेळी राजघराण्यातील मान्यवरांनी तसेच रामाचे दर्शनासाठी रामभक्त आणि रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती .फलटण येथील श्री राम मंदिर परिसराला केलेली विद्युत रोषणाई विशेष लक्षवेधक ठरत होती.

सातारा तालुक्यातील शेंद्रे- वेचले येथील देशपांडे परिवाराच्या श्रीराम मंदिरातही हा जन्म काळाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला .

मंगळवार पेठेतील श्री काळाराम मंदिरात शहा व गुजर कुटुंबीयांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .उद्या 27तारखेला ललिताच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे .दरम्यान अयोध्या येथील श्री राम मंदिराचा जन्मोत्सव सोहळा हजारो सातारकर भक्तांनी आपल्या घरी बसूनच दूरदर्शन वरून याची देही याची डोळा पद्धतीने अनुभवून श्रीरामाच्या नामाचा गजर करत हा रामनवमीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न केला.


Back to top button
Don`t copy text!