
स्थैर्य, मुंबई, दि.२८: ड्रग्ज प्रकरणात अडकलेली बॉलिवूड व साऊथ अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने पुन्हा एकदा दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रकुलने दिल्ली उच्च न्यायालयात पुन्हा एक याचिका दाखल केली आहे. ड्रग्ज केससंदर्भात आपल्याविरोधात कुठलाही लेख वा कार्यक्रम प्रसारित करण्याची अनुमती मीडियाला नाकारण्यात यावी, असा अंतरिम आदेश देण्याची मागणी रकुलने या याचिकेत केली आहे.
ड्रग्ज प्रकरणात अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावे समोर येतात, मीडियाने हे प्रकरण लावून धरले आहे. मीडिया व चाहत्यांच्या नजरा एनसीबीच्या चौकशीवर आहेत. सोशल मीडिया व मीडियाच्या माध्यमातून ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्यांविरोधात रोज नवे खुलासे, दावे होत आहेत. यात दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान या तिघींसोबतच रकुलचेही नाव आहे. मात्र या मीडिया ट्रायलमुळे आपल्या इमेजवर वाईट परिणाम होत असल्याचे रकुलचे म्हणणे आहे. त्यामुळे कोर्टाने तिच्याविरोधात सुरु असलेले हे मीडिया ट्रायल रोखण्याचे अंतरिम आदेश द्यावे, अशी मागणी तिने याचिकेत केली आहे.
यापूर्वीही दाखल केली आहे याचिका
याआधी सुशांत सिंग राजपूत प्रकरणात नाव येताच रकुलने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने प्रसारमाध्यमांनी या प्रकरणात आपले नाव घेऊ नये, असे निर्देश द्यावेत, अशी मागणी तिने या याचिकेत केली होती. याबद्दल माहिती व प्रसारण मंत्रालयाला आदेश द्यावेत असेही ती म्हणाली होती.