
साताऱ्याच्या राजवाडा परिसरातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले भाजी मंडईच्या तळमजल्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मद्यपी आणि मोकाट जनावरांच्या वावरामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
स्थैर्य, सातारा : “या जागेवर सरळ कोंडवाडा का करत नाही?” असा संतप्त सवाल सध्या साताऱ्यातील नागरिक करत आहेत. सातारा शहरातील राजवाडा परिसरातील ‘श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले फळे, फुले आणि भाजी मंडई’ची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून, येथील तळमजला गलिच्छ घाण आणि कचऱ्याने पूर्णपणे व्यापलेला आहे. लाखो रुपये खर्चून बांधलेली ही वास्तू भाजी मंडईसाठी असूनही नसल्यासारखीच झाल्याने सातारकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अवैध धंदे आणि मोकाट जनावरांचा अड्डा
सध्या या मंडईच्या तळमजल्याने अत्यंत बकाल स्वरूप धारण केले आहे. या घाणीच्या साम्राज्यात मटका आणि जुगार खेळणारे तसेच मद्यपी लोक बिनधास्तपणे वावरत असतात, ज्यामुळे या परिसरातून ये-जा करणाऱ्या महिला आणि नागरिकांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण आहे.
त्यातच मोकाट जनावरे, आणि विशेष करून गाईंचा वावर येथे रात्रंदिवस पाहायला मिळतो. जनावरांच्या मलमूत्रामुळे आणि कचऱ्यामुळे या संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
‘कोंडवाडा उभारा किंवा परिसर स्वच्छ करा’; नागरिकांची मागणी
या मंडईत दररोज भाजी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना नाईलाजाने या घाणीतूनच वाट काढावी लागते.
“भाजी मंडईसाठी हे बांधकाम करूनही त्याचा काहीच उपयोग होत नसेल, तर पालिकेने येथे या मोकाट जनावरांसाठी ‘कोंडवाडा’ तरी उभारावा किंवा हा परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवावा,” अशी आक्रमक मागणी सातारकर नागरिकांकडून होत आहे.
पालिकेला रोगराई दिसत नाही का?
आरोग्य विभागाच्या दृष्टीने या समस्येकडे अत्यंत गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. मंडईसारख्या ठिकाणी जिथे खाद्यपदार्थ आणि भाज्यांची विक्री होते, तिथेच असा उकिरडा असणे हे थेट रोगराईला आमंत्रण देण्यासारखे आहे. ‘रोगराईला आमंत्रण देणारा हा प्रकार सातारा नगरपालिकेला आणि आरोग्य विभागाला दिसत नाही का?’ असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेने तातडीने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
( छायाचित्र : अतुल देशपांडे, सातारा)

