राज्य सरकारला दूध दराच्या प्रश्नां बाबत गुडगे टेकायला लावणार : खा.राजू शेट्टी


दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात मोर्चा

स्थैर्य, सातारा : गाईच्या दूधाला दर देण्याच्या मागणीसह दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. 24 जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. गाई व बैलगाडीसह आंदोलक आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच पोलिसांनी अडवले. यावेळी अधिकार्‍यांची आंदोलकांची शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, मागणी व पुरवठा सुत्रानुसार उत्पादन कमी होवूनही दुधाचे दर का पडले आहेत असा सवाल करत दुधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान त्वरीत द्यावे, अन्यथा कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला. दरम्यान, जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. 

सुरुवातीला पुणे-बेंगलोर महामार्गावर बाँम्बे रेस्टॉरंट येथे खा. राजू  शेट्टी यांचे आगमन झाल्यनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर आंदोलकांना त्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. यावेळी खा. शेट्टी म्हणाले, बाजारपेठेतील मागणीवर दर ठरत असतात. मागणी व पुरवठा या सुत्रानुसार दर कमी-जास्त होतात. गरजेपेक्षा पुरवठा वाढला तर दर पडतात आणि गरजेपेक्षा पुरवठा कमी झाला तर दर वाढतात. आज गेल्या चार-पाच वर्षातील माहिती घेतली तर सध्या दुधाचा दुष्काळ सुरू आहे. गेल्या तीन-चार वर्षांच्या मानाने यावर्षी दुधाचे उत्पादन कमी झाले आहे. दोन वर्षापूर्वी झालेला दुष्काळ किंवा सातत्याने कमी होणारे दुधाचे भाव असतील, या कारणांमुळे शेतकर्‍यांनी जनावरांची संख्या कमी केली आहे. मग दुधाचे उत्पादन कमी झाले असतील दुधाचे पडायचे कारणच काय? लॉकडाऊन जाहीर होण्यापुर्वी अनेक जाणकारांनी आपले अंदाज व्यक्त केले होते की यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये दर जास्त असणार. गाईच्या दुधाचा भाव 40 ते 41 पर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, सध्या गाईच्या दुधाचा भाव 17 रुपयांपर्यंत खाली आला आहे.शेतकर्‍यांना उत्पादन खर्चापेक्षा 10 रूपये कमी दराने शेतकर्‍यांना दूध विकावे लागत आहे. त्यामुळे दुधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान देऊन 25 रूपये लिटरला भाव देण्याची गरज असल्याचे खा. शेट्टी म्हणाले. 

यानंतर जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर 17 ते 20 रूपये दूध दर दिला जातो. यामुळे दूध उत्पादक शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. विषाणूचा प्रादुर्भावाने राज्यातील दूध व्यवसायावर संक्रात आलेली आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल, आईस्क्रिम, मॉल, विवाह सोहळे आदी बंद झाले आहेत. याचा विपरीत परिणाम दुधाच्या खपावर झालेला आहे. राज्यात दररोजचे दूध उत्पादन 119 लाख लिटर आहे. 52 लाख लिटर हे अतिरिक्त झाले आहे. तसेच दूध पावडरचा दर 330 रूपयांवरून 180 रूपयावर आलेला आहे. कोरोनामळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चीन, युरोप व आफ्रिका या देशातील निर्यात बंद झाले आहे. देशात सध्या 1.5 लाख टन दूध पावडर शिल्लक असून राज्यात देखील 50 हजार टन दूध पावडर शिल्लक आहे. तरीही केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेऊन दूध उत्पादकांना देशोधडीस लावण्याचे पाप करत आहेत. तसेच बटरचा दर 340 रूपयावरून 220 रूपये झाले आहे. याचा परिणाम दूध खरेदीवर झाला असून अनेक संस्था 17 ते 20 रूपये लिटरने दुधाची खरेदी करत आहेत. दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे राज्यात पँकीग दुधात 19 लाख लिटरने घट झालेली आहे. सन 2018 मध्ये आम्ही दूध आंदोलन केल्यानंतर शासनाने प्रति लिटर 5 रूपयेचे अनुदान जाहीर करून 700 कोटी रूपयेचे अनुदान दूध उत्पादकांना दिले होते. याचा फायदा राज्यातील 46 लाख दूध उत्पादकांना झाला होता. त्याप्रमाणे राज्य सरकारने प्रतिलिटर दुधास 5 रूपयांचे अनुदान द्यावे. तसेच केंद्र सरकारने 30 हजार टन दूध पावडर बफर स्टॉक करावा. दूध पावडर करीता प्रतिकिलो 50 रूपये अनुदान देण्यात यावे. दूध पावडर, बटर व तूप यावरील जीएसटी कमी करण्यात यावे. या मागणीकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 21 जुलै रोजी सातारा जिल्ह्यात एक दिवसाचे दूध बंद आंदोलन करण्यात आले होते. माय बाप सरकारला जाग आलेली नाही. उत्पादन खर्चापेक्षा 10 रूपये कमी दराने शेतकर्‍यांना दूध विकावे लागत आहे. दुधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान देऊन 25 रूपये लिटरला भाव द्यावा, या मागणीसाठी आम्ही जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी जनावरांसहित आलो आहोत. आमच्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवून शेतकर्यांच्या दुधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान त्वरीत द्यावे, अन्यथा कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!