दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२४ | फलटण |
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जावली, ता. फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी राजनंदिनी विठ्ठल पडर हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या स्पर्धा १८ ऑक्टोबर रोजी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल येथे पार पडल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण ७ नोव्हेंबर रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि शिक्षण अधिकारी शबनम मुजावर यांच्या हस्ते होणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे आपल्या प्राथमिक शिक्षणाची सुरूवात केली. त्याप्रीत्यर्थ महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे दरवर्षी ७ नोव्हेंबर हा दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, या हेतूने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर बोलताना अत्यंत ओघवत्या शैलीत मनोगत व्यक्त करत राजनंदिनी हिने अत्यंत कमी वयात हे यश संपादन केले आहे. त्याबद्दल जिल्हा परिषद शाळा जावलीचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, जावली केंद्रातील सर्व शिक्षक व जावली ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.