व्यसनमुक्त युवक संघाची राजगड ते रायगड पायी मोहीम यशस्वी


दैनिक स्थैर्य । 16 एप्रिल 2025। फलटण । व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रचे संस्थापक, युवकमित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या प्रेरणेने किल्ले राजगड ते रायगड अशी पायी मोहीम व्यसनमुक्तीच्या युवकांनी नुकतीच 2 दिवसात यशस्वी केली.

व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर यशस्वीरित्या राबविले जातात. या संघटनेच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांपासून अनेक मोहिमा व कार्यक्रम आयोजित केले जातात.

युवकांना इतिहास कसा जगावा, याबाबत माहिती व मार्गदर्शन यासाठी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी किल्ल्याच्या अनेक मोहिमा आयोजित केल्या आहेत. आग्रा ते राजगड, संगमेश्वर ते तुळापूर, पन्हाळा ते विशाळगड, पुरंदर ते तुळापूर, पेडगाव ते तुळापूर, राजगड ते रायगड अशा अनेक मोहिमा आयोजित करुन युवकांना इतिहासाची आवड निर्माण केली आहे.

रविवार दि. 13 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी रायगड येथे साजरी झाली.
व्यसनमुक्त युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवार दि. 9 रोजी रात्री दीड वाजता राजगड किल्ला चढून हे युवक मुक्कामास राहिले. गुरुवार दि. 10 रोजी सकाळी प्रार्थना घेऊन प्रारंभ करण्यात आला. बालेकिल्ल्यातून पश्चिमेस असणार्‍या संजीवनी माचीमधून रायगड किल्ल्याच्या दिशेने प्रवास चालू झाला. सुमारे 2 तास चालल्यानंतर बुधला माची वरुन तोरणा गड चढून तोरणा किल्ल्यावर पोहोचले. तोरणा किल्ला डोंगर कपारीमधून उतरुन पुढे भट्टी या गावातून पुढे गेळगाण, धनगरवाडामार्गे मोहरी या गावात रात्री मुक्काम केला. इथपर्यंत सुमारे 35 कि. मी.अंतर पार झाले होते.

शुक्रवारी पहाटे 5 वा. उठून झाडाझुडपातून वाट काढीत पुणे आणि रायगड जिल्ह्याची सरहद्द असणारी सिंगापूरची खोल दरी उतरायला सुरुवात केली. पुढे दापोली या गावात पोहोचले. या गावातूनच वाहणारी काळ नदी पार करुन रायगडच्या दिशेने निघाले. रात्री 8 वाजता किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले. दीड तास रायगड किल्ल्याच्या पायर्‍या चढून वर पोहोचले. होळीचा माळ, जगदिश्वरांचे मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज समाधी स्थळ येथे फुलांनी सजावट केली होती. पोवाडा, गारद यांनी वातावरण आणखीन उत्साहवर्धक बनले होते. व्यसनमुक्त युवक संघटनेच्या शिलेदारांनी महाराजांच्या समाधी समोर काकडा भजन केले.

या मोहिमेत दीपक जाधव, बिभीषण इंदलकर, उत्तमबापू अवताडे, संजय पराडे, नानासाहेब पवार, गणेश जगदाळे हे व्यसनमुक्त युवक संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!