राजेश टोपेजी ! सातार्‍यात तुमचं स्वागत…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०९ : ‘आई’ गेल्याचं दु:ख काय असतं, पोरकं झाल्याची भावना काय असते हे आम्ही ‘माणूस’ म्हणून जाणू शकतो.. म्हणूनच ही डोंगराएवढी वेदना बाजूला सारून तुम्ही कोरोना संकटकाळाशी दोन हात करण्यासाठी जीवाचं रान करत आहात, याचं मनापासून कौतुक करावंसं वाटतं. पण…

…आजची तुमची सातारा भेट खूप वेगळी आहे. ते कोरोनाविषयक सर्व्हे वगैरे तुम्ही करालच. त्याविषयी खात्रीय. पण गेले तीनचार दिवस सगळा जिल्हा एका गोष्टीमुळे संतापानं खदखदतोय. माणूसपणाला काळीमा फासणारी, शरमेनं मान खाली घालायला लावणारी क्रूर घटना ‘आपल्या’ सातार्‍यात घडलीये या जीवघेण्या घुसमटीतून प्रत्येक सातारकर चाललाय. तुम्हालाही ती कळली असणारच, किंबहूना तुमच्या सातारा भेटीचं मुख्य प्रयोजन तेच असावं असा विश्वास आहे !

जन्माला येण्यापूर्वीच ड्रेनेजमध्ये दबल्या गेलेल्या आपल्या असंख्य बहिणींच्या निर्घूण खूनाला या दोन अर्भकांच्या प्रेतांनी वाचा फोडलीये… ते प्रकरण तातडीनं धसाला लावा. त्याची पाळंमुळं खणून काढा. अनेक पुरावे नष्ट होण्याच्या आत दोषींपर्यन्त पोहोचण्यासाठी तुमच्या हातात असलेली सगळी यंत्रणा कामाला लावा. सिव्हील हाॅस्पीटल आणि परीसर हा सातारकरांच्या माथ्यावरचा ‘कलंक’ ठरलाय. तो पुसण्यात तुम्ही अपयशी ठरलात तर सातारकर तुम्हाला आयुष्यात माफ करणार नाहीत.

जन्माला येण्याआधी कोवळ्या लेकींच्या नरड्याला नख लावणार्‍या नराधम डाॅक्टर आणि आईबापांना अशी अद्दल घडवा की इथून पुढे गर्भलिंग तपासणी आणि असलं किळसवाणं कृत्य करताना हे नराधम थरथरले पाहिजेत.

सगळी न्यूज चॅनल्स सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येसारख्या जागतीक समस्येत गुंतलेली असल्यामुळे अशा पोस्टमधून या भावना तुमच्यापर्यन्त पोहोचवायची वेळ आलीये. पण लक्षात असूद्या, सातारा सिव्हील हाॅस्पीटलची ही घटना तुमची विश्वासार्हता आणि भविष्य ठरवणार आहे.. याच आमच्या सातारा जिल्ह्यात सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला होता हे आम्ही कुठल्या तोंडानं सांगू ??? आता बास. आमच्या बहीणींना, आयांना, बायकांना, मुलींना आता ‘न्याय’ द्या…सिव्हील हाॅस्पीटल प्रकरणातील आरोपींना शोधून काढा..

सातार्‍यात तुमचं स्वागत…

किरण माने.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!