दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२२ । आटपाडी । आटपाडी येथे डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी वर्षानिमित्त दि. ११ व १२ जुलै, २०२२ रोजी ‘डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलन, आटपाडी २०२२’ या भव्य-दिव्य अशा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख यांनी विटा येथे आमदार अनिलभाऊ बाबर व माजी आमदार सदाशिवराव (भाऊ) पाटील यांची निवासस्थानी भेट घेऊन संमेलनाला उपस्थित राहण्याचे अगत्याचे निमंत्रण दिले. यावेळी डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठानचे सचिव विलासराव खरात, आटपाडी येथील ज्येष्ठ पत्रकार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक व दै.प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके उपस्थित होते.
आटपाडीचे सुपुत्र व थोर साहित्यिक डॉ.शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दि. ११ व १२ जुलै, २०२२ रोजी आटपाडी येथील जवळे मल्टीपर्पज हॉल येथे ‘डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलन, आटपाडी २०२२’ या भव्य-दिव्य अशा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील संमेलनाचे उद्घाटक असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, खासदार संजयकाका पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीकदादा पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व मराठी साहित्य परिषद पुणेचे आटपाडी शाखा अध्यक्ष अमरसिंह देशमुख, आदी दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे
तसेच उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, एबीपी माझा मराठी न्यूज चैनल मुंबई चे संपादक राजीव खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्य संमेलनाच्या समारोपाचा कार्यक्रम संपन्न होत आहे.
या कार्यक्रमात परिसंवाद, कविसंमेलने, बाल वाड़मय व बालककट्टा, पुस्तक प्रकाशन, माणदेशातील कलावंतांचा गुणगौरव यासह मनोरंजनाचा कार्यक्रम विविध सत्रांमध्ये आयोजित केला आहे.
राज्यातील साहित्यिक मंडळी या दोन दिवसीय साहित्य संमेलनामध्ये उपस्थित राहून सहभागी होणार आहेत. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. त्यांच्या संपूर्ण मार्गदर्शन व नियोजनाखाली हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासंदर्भात वाटचाल सुरू आहे. त्यानिमित्ताने राजेंद्रअण्णा देशमुख यांनी आमदार अनिलभाऊ बाबर आणि माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन या संमेलनाला उपस्थित राहणे बाबतचे अगत्याचे निमंत्रण दिले.