
स्थैर्य, फलटण, दि. १४ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेवर सलग ३० वर्षे एकहाती सत्ता गाजवणाऱ्या राजे गटाची आगामी निवडणुकीतील भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. विधानपरिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आजवर नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, यंदा सहजासहजी सत्ता काबीज करता येईल, अशी स्थिती राहिलेली नाही. राजे गटासमोर आपले गड राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
राजे गटासाठी जमिनीवर काम करणारी आणि जनतेत दांडगा जनसंपर्क असलेली दिग्गज नेतेमंडळी एकापाठोपाठ एक साथ सोडून जात आहेत. माजी नगराध्यक्ष सोमशेठ जाधव आणि सनी अहिवळे यांच्यासारखे पारंपरिक मतांचे गट्ठे सोबत असणारे नेते आता राजे गटात नाहीत. त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील गटात प्रवेश केला आहे. याशिवाय, आणखी काही मातब्बर नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत असल्याने राजे गटाच्या चिंतेत भर पडली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे ३ दिवस शिल्लक असताना अद्याप राजे गटाचा अधिकृत पक्ष आणि चिन्ह जनतेसमोर आलेले नाही. लोकसभा निवडणुकीत श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत अनिकेतराजे आणि श्रीमंत विश्वजितराजे यांनी अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (तुतारी) सहभाग नोंदवला होता. त्यानंतर विधानसभेत अजित पवारांची उमेदवारी नाकारून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली, ज्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मध्यंतरी पुन्हा अजित पवार गटात प्रवेशाच्या चर्चा झाल्या, मात्र अद्याप तो प्रवेश झालेला नाही. त्यामुळे राजे गट ‘तुतारी’वर लढणार की ‘छत्री’वर, याबाबत संभ्रम कायम आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र आणि माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचे नाव जोरदार चर्चेत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत गटाची झालेली पडझड आणि दिग्गज नेत्यांचे पक्षांतर पाहता श्रीमंत अनिकेतराजे स्वतः निवडणूक लढवणार की ऐनवेळी दुसराच उमेदवार रिंगणात उतरवला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रचारातील भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही. श्रीमंत रामराजे हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य आहेत. जर राजे गटाने वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवली, तर ज्या पक्षात ते आमदार आहेत, त्या पक्षाच्या अधिकृत चिन्हाविरोधात ते सक्रिय प्रचारात दिसणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. तांत्रिक आणि राजकीय पेचात राजे गटाची रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक अर्ज भरल्यानंतर प्रचारासाठी केवळ दोन आठवड्यांचा कालावधी मिळणार आहे. अशा परिस्थितीत अद्याप चिन्ह आणि पक्ष स्पष्ट नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. दुसरीकडे, महायुती आणि खासदार गटाने प्रचारात आघाडी घेतली असताना राजे गटाच्या या मौनामुळे मतदारांमध्येही विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
येत्या एक-दोन दिवसांत राजे गटाला आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. ३० वर्षांची सत्ता राखण्यासाठी राजे गट कोणता ‘मास्टर स्ट्रोक’ खेळणार आणि बंडखोरी कशी रोखणार, यावरच या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
