लोकसभेच्या मताधिक्यामुळे राजे गटाचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे : माजी खासदार रणजितसिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 24 जुलै 2024 | फलटण | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये फलटण तालुक्यामधून जे मला मताधिक्य मिळालेले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये फलटण तालुक्याचा रखडलेला विकास मार्गी लावण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. यामुळे श्रीमंत रामराजे व त्यांच्या दोन्ही बंधूंसह संपूर्ण राजे गटाचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले असल्याची बोचरी टीका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील संपर्क कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत रणजितसिंह बोलत होते. यावेळी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष नरसिंह निकम, युवा नेते धनंजय साळुंखे – पाटील, रणजितसिंह दिलीपसिंह भोसले, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह म्हणाले की; नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माझा पराभव करण्यासाठी श्रीमंत रामराजे यांच्यासह त्यांच्या दोन्ही बंधूंनी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. त्यामध्ये त्यांना यश आले असले तरीसुद्धा फलटण तालुक्याने आता राजे गटाला नाकारले आहे. याचे कारण म्हणजे लोकसभेला फलटण तालुक्यासह विधानसभा मतदारसंघांमधून जे मताधिक्य भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात सर्वसामान्य नागरिकांनी दिले आहे; त्यामुळे यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

दूध संघाच्या सभासदांबाबत बोलतात; सभासदच ठेवले नाहीत तर ते उपस्थित कसे राहणार?

गतकाही दिवसापूर्वी फलटण तालुका सहकारी दूध संघाची जमीन विक्री करण्यासाठी काढण्यात आली होती. त्या विरोधात फलटण प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्याला उत्तर देताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले होते की; मोर्चा काढलेल्यांमध्ये एकही सभासद नाही. त्यावर रणजितसिंह म्हणाले की; स्वतःची खाजगी दूध संस्था वाढवण्यासाठी फलटण तालुका सहकारी दूध संघा मध्ये सभासद सुद्धा ठेवले नाहीत व वाढवले नाहीत. जर सभासदच ठेवले नाहीत तर ते दूध कसे घालणार ? असा प्रतिसवाल सुद्धा यावेळी उपस्थित केला.

श्रीराम कारखान्यामुळे व गोविंद मिल्कमुळे निरा नदीचे प्रदूषण; शरद पवारांची सुद्धा कबुली

फलटण येथील असणाऱ्या श्रीराम कारखाना, गोविंद मिल्क व कत्तलखान्यामुळे मुळे दूषित पाणी ओढ्यामधून नीरा नदीला मिळते. याबाबत सांगवी ग्रामस्थांनी शरद पवारांची गाडी अडवल्यानंतर दस्तुरखुद्द यांचे नेते असलेल्या शरद पवारांनी सुद्धा स्पष्ट शब्दात श्रीराम कारखाना, गोविंद मिल्क व कत्तलखान्यामुळे निरा नदीचे पाणी दूषित होत असल्याची कबुली दिली होती. याबाबतची व्हिडीओ क्लिप सुद्धा माजी खासदार रणजितसिंह यांनी पत्रकार परिषदेमध्ये लावून दाखवली. लोकसभा निवडणुकीत तुम्ही ज्यांना मदत केली तेच तुमचे नेते म्हणत आहेत की; निरा नदी प्रदूषणासाठी श्रीराम कारखाना, गोविंद मिल्क व कत्तलखाना कारणीभूत आहे. आता यावर तुम्ही जनतेला काय उत्तर देणार आहात? असेही यावेळी रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.

दालवडीसह परिसर जर स्वराज कारखान्यामुळे दूषित झाला असेल तर तिथून मला लोकसभेला मताधिक्य कसे काय?

यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह म्हणाले की; स्वराज कारखान्यामुळे उपळवे भागासह शेजारी गावांमधील असणाऱ्या अनेक ओढून आले व तलाव हे दूषित झाले आहेत; असा आरोप जे माझ्यावर लावत आहेत. त्यांनी याचे सुद्धा उत्तर देणे गरजेचे आहे की; नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दालवडी गावासह उपळवे परिसरातील गावांमधून मला मताधिक्य मिळालेले आहे. जर त्या परिसराचे नुकसान माझ्यामुळे झाले असेल; तर तेथील सर्वसामान्य नागरिकांची मते मला देऊन मला मताधिक्य त्यांनी कसे काय दिले आहे.

“मोक्का” मधले किती कार्यकर्ते हे यांचे पदाधिकारी आहेत?

फलटण शहरासह तालुक्यामध्ये दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना अभय देण्याचे काम नेहमीच राजे गटाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. आता फलटणकर जनता सुज्ञ झालेली असून दोन नंबर करणारे अनेक “मोक्का” मधील कार्यकर्ते हे यांचे पदाधिकारी राहिलेले आहेत. याचे उत्तर कुणीही देण्याची आवश्यकता नाही; आगामी निवडणुकीमध्ये जनताच याचे उत्तर देईल; असे सुद्धा यावेळी रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.

विमानतळ वाचवण्यासाठीच लोकनेत्यांनी तसा अर्ज केला असेल

फलटण शहरामध्ये असणारे विमानतळ हे स्वतःच्या घशात घालण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून यांचे प्रयत्न सुरू आहेत. माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी सुद्धा विमानतळ वाचवण्यासाठी विविध प्रयत्न केले होते. त्यांनी जो अर्ज दाखवला तो नक्की काय आहे? किंवा तो का दिला होता? याबाबत मला स्पष्ट माहिती नाही. परंतु त्यावेळी यांच्या घशामध्ये विमानतळ जाऊ नये म्हणून माजी खासदार स्व. हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी विमानतळाच्या बाबत अर्ज दिला असण्याची शक्यता आहे; असे यावेळी माजी खासदार रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!