दैनिक स्थैर्य | दि. 30 सप्टेंबर 2024 | फलटण | घरेलु कामगारांच्या मागण्या आमच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मागील अधिवेशन काळात आम्ही सदर बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यामध्ये महिला कामगारांना विमा, भांडी किट व इतर बाबींना महिला कामगारांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आता श्रीमंत रामराजे व संजीवराजे यांच्या माध्यमातून शालेय किट व इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आगामी काळामध्ये राजे गट घरेलु कामगारांच्या सोबत राहणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी दिली.
फलटण येथील अनंत मंगल कार्यालय येथे घरेलु कामगारांच्या आयोजित कार्यक्रमात आमदार दीपक चव्हाण बोलत होते. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, दूध संघाचे अध्यक्ष धनंजय पवार, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर, समता घरेलु कामगार संघटना सातारा अध्यक्ष सौ. कल्पना मोहिते यांच्यासह घरेलु कामगार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले की; घरेलु कामगारांना श्रीमंत संजीवराजे यांचे नेहमीच सहकार्य असते. सौ. कल्पना मोहिते यांचे कामकाज चांगले आहे. घरेलु कामगारांना ज्ञाय मिळण्यासाठी त्या कामकाज करीत आहे. ज्या महिला कोणत्याही संघटनेत काम करीत नाहीत त्यांना सुद्धा आपल्या ह्या संघटनेत समाविष्ट करून घ्यावेत.
शासनाच्या योजना ह्या आमदार दीपक चव्हाण यांच्या माध्यमातून घरेलु कामगारांना मिळणार आहे. शैक्षणिक साहित्य हे आज दिले जात आहे. येणाऱ्या दोन दिवसात शैक्षणिक बॅग सुद्धा देण्यात येणार आहे. आता घरेलु काम करणाऱ्या मोठ्या प्रमाणात आहे. घरेलु काम करणाऱ्या महिला ह्या त्यांच्या कुटुंबात अडचण असल्याने मुळेच दुसऱ्याच्या घरात जावून काम करत असतात. त्यामुळे आपल्या सोबत आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी ह्या महिला काम करीत असतात; असे मत यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की; सौ. कल्पना मोहिते यांचे कामकाज अतिशय उत्कृष्ठ आहे. समाजात दुर्लक्षित असलेल्या कामगारांना एकत्रित करण्याचे काम आज केले आहे. घरेलु कामगारांच्या पाठीशी आम्ही कायम ठामपणे उभे राहणार आहे. समाजात दुर्लक्षित असलेला हा घटक आम्ही आता बघणार आहे. आमच्या कडून सुद्धा सर्व सहकार्य आम्ही देणार आहे.
फलटण तालुक्यातील सर्व घरेलु कामगारांना श्रीमंत संजीवराजे हे नेहमीच मदत करत असतात. या कार्यक्रमामध्ये आज श्रीमंत संजीवराजे यांच्या माध्यमातून घरेलु कामगारांच्या मुलांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात येणार आहे. कामगार कल्याण विभागाच्या माध्यमातून घरेलु कामगारांना भांडी किट मिळाले आहे. ते किट सुद्धा आचारसंहिता लागण्यापूर्वी मिळावी; अशी विनंती यावेळी सौ. कल्पना मोहिते यांनी केली.