झेडपी निवडणुकीच्या रागातून राजाळेत ‘गुंडगिरी’चा नंगानाच! ‘राष्ट्रवादी’चे काम केल्याच्या कारणावरून घरात घुसून दाम्पत्याला बेदम मारहाण; चौघांवर गंभीर गुन्हा दाखल


नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील राजकीय वैमनस्यातून राजाळे (ता. फलटण) येथे एका ५६ वर्षीय शेतकऱ्याला आणि त्यांच्या पत्नीला घरात घुसून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 16 फेब्रुवारी : सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असल्या, तरी या निवडणुकीच्या रणधुमाळीतून निर्माण झालेले राजकीय वैमनस्य आणि गुंडगिरी आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ पक्षाच्या उमेदवारांचे काम का केले? या कारणावरून राजाळे (ता. फलटण) येथे भरदिवसा घरात घुसून एका शेतकऱ्याला आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चार राजकीय कार्यकर्त्यांवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत (BNS) गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दत्तात्रय महादेव महिपाल (वय ५६ वर्षे, रा. राजाळे, ता. फलटण) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

असा घडला राजकीय वैमनस्याचा थरार!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि दाखल फिर्यादीनुसार, दि. ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत फिर्यादी महिपाल यांनी विडणी गटातील राष्ट्रवादी पक्षाच्या जि.प. उमेदवार सुषमा अविनाश मोरे आणि पंचायत समितीच्या उमेदवार सुषमा संजय सोडमिसे यांच्या प्रचारार्थ काम केले होते.

याच राजकीय कामाचा राग मनात धरून, दि. ८ फेब्रुवारी रोजी फिर्यादी महिपाल हे त्यांच्या सलूनच्या दुकानात काम करत असताना गावातील स्वप्निल निकम आणि सोन्या भोईटे हे तिथे आले. “तू राजकीय पक्षाचे लय काम करतोय, पक्षाच्या जीवावर लय उड्या मारतोय, तुला आता दाखवतो, तुझा मेंदूच काढून ठेवतो,” अशी अत्यंत भयंकर धमकी देऊन ते निघून गेले होते.

घरात घुसून दाम्पत्याला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

या धमकीनंतर दोनच दिवसांनी, म्हणजेच दि. १० फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिपाल हे आपल्या घरात चहा पीत बसले होते. त्यावेळी गावातील सुभाष भोईटे आणि अनिकेत भोईटे यांनी थेट त्यांच्या घरात घुसखोरी केली. “तू रानात घावलास की तुला मारून टाकणार आहे,” अशी थेट धमकी देत त्यांनी महिपाल यांना हाताने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

थोड्याच वेळात त्यांच्यासोबत स्वप्निल निकम आणि सोन्या भोईटे हे दोघेही तिथे आले. या चौघांनी मिळून महिपाल आणि त्यांच्या पत्नीला अत्यंत अश्लील शिवीगाळ करत, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीचा आणि भांडणाचा मोठा आवाज ऐकून शेजारी राहणारे संतोष महिपाल आणि शरद महाराज निंबाळकर हे पळत घराकडे येऊ लागले. लोक जमा होत असल्याचे पाहून या चौघांनी आपली गाडी फिर्यादीच्या घरासमोरच सोडून तेथून धूम ठोकली.

ग्रामीण पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल

या भयंकर प्रकारानंतर जखमी झालेल्या महिपाल दाम्पत्याने सरकारी रुग्णालयात औषधोपचार घेऊन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिपाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजाळे येथील १) स्वप्निल रमेश निकम, २) सोन्या धनाजी भोईटे, ३) सुभाष धनाजी भोईटे आणि ४) अनिकेत अशोक भोईटे (सर्व रा. राजाळे, ता. फलटण) या चार जणांवर भारतीय न्याय संहिता (BNS 2023) कलम ११५(२), ३(५), ३५१(२), ३५२ आणि ३३३ प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकीय कारणावरून सर्वसामान्य नागरिकांच्या घरात घुसून अशी दहशत माजवल्याने राजाळे गावात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!