दैनिक स्थैर्य | दि. २६ जून २०२३ | फलटण |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजाळे सर्कल (सोनगाव बंगला) येथे १९८२-८३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा (गेट टुगेदर) उत्साहात संपन्न झाला.
गेल्या ४० वर्षांपासून होणार्या भेटीसाठी शिक्षक-विद्यार्थी आतूर झाले होते. या विद्यार्थ्यांना त्यावेळी वर्गशिक्षक म्हणून गुरूवर्य हणमंत घार्गे तसेच सहशिक्षक पोपटसिंह निंबाळकर व कृष्णा जाधव लाभले होते. याच शिक्षकांच्या संस्काराने घडलेली ही पिढी एका विचाराने एकत्र आली. ज्या शाळेत खेळलो, बागडलो, ज्ञान घेतले, त्या शाळेच्या जुन्या आठवणींचा उजाळा यावेळी विद्यार्थी-शिक्षकांनी दिला.
या कार्यक्रमाला सर्व शिक्षक स्टाफ, मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळे स्वरूप आले आणि सर्वांच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. २८ वर्षापूर्वीची परिस्थिती ही फार वेगळी होती व आता प्रौढ स्थितीतील ही वेगळी आहे. याअगोदर विद्यार्थी म्हणून होतो व आता २८ वर्षानंतर माजी विद्यार्थी म्हणून एकत्र आल्याने वेगळेच चित्र पाहायला मिळाले.
यावेळी काही शिक्षक मंडळींनी आपल्या बॅचच्या संदर्भातील मनोगत व्यक्त केले. या गेट-टुगेदर च्या कार्यक्रमामुळे आपण कुठे आहे आणि आपले मित्र-मैत्रिणी कुठे आहेत, कोणत्या पोस्टवर ते काम करत आहेत, हे एकमेकांना अवगत झाले. हा कार्यक्रम काही तासातच संपेल असे वाटले, पण जुन्या आठवणींमध्ये वेळ कसा गेला, हे सर्वांना कळालेच नाही.
यावेळी डॉ. राजेंद्र बुरुंगले, दत्ता मोहिते, डॉ. सुरेश चव्हाण, मुख्याध्यापक धनाजी मोरे, बापूराव दळवी, प्रा. डॉ. संजय जगताप, ज्ञानदेव शिंगाडे, चंद्रकांत गोवेकर, शिवाजी झंजे, रंगनाथ घोलप, सुरेश मोरे, दीपक मोरे, शरद थोरात, रंजना आडके (जाधव), सुरेश जगताप या सर्वांनी मनोगत वेक्त केले. या कार्यक्रमासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे प्राध्यापक संजय जगताप यांनी व्यासपीठ सांभाळण्याचे काम केले.
प्रास्ताविक धनाजी मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोपट निंबाळकर होते, तर कार्यक्रमात सत्कारमूर्ती वर्गशिक्षक घाडगे होते. कार्यक्रमासाठी डॉ. स्नेहल घार्गे, कदम मॅडम, सोनगावचे सरपंच जोत्सनाताई जगताप, उपसरपंच संगीता हनुमंत गोरे, ग्रामपंचायत सदस्य व मा. सरपंच पोपटराव बुरुंगले, त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा. राजेश निकाळजे, धर्मराज लांडगे, संदीप चव्हाण, रमेश जगताप, मा. सरपंच राजेंद्र आडके, दत्तात्रय चव्हाण, ग्रामस्थ महिलावर्ग उपस्थित होता.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला ऑफीस टेबल, खुर्च्या भेट देण्यात आल्या. तर घाडगे गुरूजी यांनी शाळेला सिलिंग फॅन भेटवस्तू दिली. सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे आभार रविंद्र बुरूंगले यांनी मानले.