स्थैर्य,मुंबई, दि.६: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज वाशी न्यायालयात दाखल झाले आहेत. दरम्यान न्यायालयाबाहेर मनसैनिकांची गर्दी असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी जामिन अर्ज दाखल केला असल्याची माहिती आहे.
वाशी न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कुणालाही आत जाण्यास परवानगी नाही. त्यासोबतच न्यायालयाबाहेर बॅरिगेटिंग लावण्यात आली आहे. राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर उपस्थित असल्याची माहिती आहे.
मनसैनिकांमध्ये उत्साह
महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राज ठाकरेंचा हा नवी मुंबई दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान मनसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. मनसैनिक न्यायालयाबाहेर दाखल झाले आहेत. वाशी टोलनाक्यावर राज ठाकरेंचे मनसैनिकांकडून स्वागत करण्यात आले.
कोर्टाने हजर राहण्याचा समन्स बजावला होता
30 जानेवारी 2014 ला वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये प्रोक्षोभक वक्तव्य केल्यामुळे राज ठाकरे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राज ठाकरे यांना जबाब नोंदवण्यासाठी कोर्टाने हजर राहण्याचे समन्स बजावले.
मनसैनिकांची पोस्टरबाजी
महत्त्वाचे म्हणजे राज ठाकरे हे आज न्यायालयात हजर राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी टोलनाक्यावरच पोस्टरबाजी केली असल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे येत असल्याने याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जात आहे.
सायन-पनवेल महामार्गावर वाशी टोलनाका ओलांडताना नजरेस पडणाऱ्या होर्डींग्सवर बॅनरबाजी करण्यात आली आहे. बेलापूर सेक्टर 15 येथील न्यायालयाच्या इमारतीसमोरील दुभाजकावरही राज ठाकरे यांचे स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले आहेत.
राज ठाकरेंवर हा आहे आरोप
राज ठाकरे यांच्यावर आरोप आहे की, 26 जानेवारी 2014 ला राज ठाकरे यांनी वाशी टोलनाका बंद करण्यासाठी भडकाऊ भाषण केले होते. हे भाषण त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या एका सभेदरम्यान केले होते. ज्यानंतर गजानन काळेंसह अनेक कार्यकर्त्यांनी वाशी टोलनाक्यावर तोडफोड केली होती. या प्रकरणी 30 जानेवारीला 2014 ला वाशी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात 2018 आणि 2020 मध्ये राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली होती.