स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१४: कोरोना महामारीच्या दरम्यान 17 व्या लोकसभेचे चौथे सत्र सुरू झाले आहे. लोकसभेची कारवाई सकाळी 9 वाजता सुरू झाली. सभागृहाने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर ही कार्यवाही एक तासासाठी तहकूब करण्यात आली.दुसरीकडे, राज्यसभेतील कामकाज दुपारी तीन वाजता सुरू होईल. पहिल्या दिवशी राज्यसभेत उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत खबरदारी महत्वाची आहे. आपले सैनिक सीमेवर सज्ज आहेत आणि संपूर्ण सभागृह त्यांच्यासोबत आहे.
पुढे बोलतान ते म्हणाले की, कठीण काळात संसदेचे सत्र सुरू होत आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे कर्तव्य आहे. खासदारांनी कर्तव्याचा मार्ग निवडला. मी त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. सभागृहात जेवढी सखोल चर्चा होते, त्याचा फायदा देशाला, संसदेला होतो असा प्रत्येकाचा अनुभव आहे. आपम सर्व ही परंपरा पुढे कायम ठेवू.
मोदी म्हणाले की आज आपल्या सैन्यातील शूर सैनिक धैर्याने, उत्कटतेने, उच्च विचारांसह सीमेवर उभे आहेत. काही दिवसांनी हिमवृष्टी देखील सुरू होईल. अशा वेळी संसदेतून एक भाव आणि एका सुरात असा आवाज यावा की देश आणि संपूर्ण सभागृह त्यांच्या पाठीशी उभे आहे. कोरोनाच्या काळात जोपर्यंत औषध येत नाही तोपर्यंत खबरदारी बाळगावी. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात व्हॅक्सीन तयार व्हावी आणि आपल्याला मिळावी अशी आमची इच्छा आहे.