स्थैर्य, फलटण, दि. १६ : गेले दोन ते तीन दिवस फलटण शहरासह तालुक्यात पावसाने धुडघूस घातला होता. पावसामुळे नदी, ओढे, नाले तुडूंब भरुन वाहिल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. तर ओढ्या व नदीवरील पूलावरुन पाणी वाहिल्याने काही प्रमुख मार्गावरील वाहतूक रात्री उशिरा काही वेळासाठी ठप्प झालेली होती. पावसामुळे अनेक ठिकाणी घरे, शेत पिके, पूल, साकव यांचे मोठे नुकसान झाले आहे.
बाणगंगा धरण पूर्ण भरले असताना बाणगंगा नदीवरील सर्व २९ बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. नदी क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने बाणगंगा नदीसह तालुक्यातील छोटे मोठे ओढे, नाले, ओहोळ यांनाही पूर आला. शहरातील नदी लगत असलेल्या शनीनगर येथील घरामध्ये पाणी घुसल्याने येथील नागरिकांचे हाल झाले. तसेच मलठणला जोडणारे दत्त मंदिर पूल व सदगुरू हरिबुवा महाराज मंदीर पूलांचेही नुकसान झाले आहे. येथून मालवाहतूक करणाराछोटा टेम्पोही पाण्यात वाहून गेला. फलटण-पंढरपूर रस्त्यावर विडणी येथे व फलटण-दहिवडी रस्त्यावर भाडळी बु. येथील ओढ्यावरील पुलावरुन पाणी वाहिल्याने या प्रमुख मार्गांवरील वाहतूक रात्रभर ठप्प होती.
फलटण – सातारा मार्गावर घाडगेवाडी येथील ओढेही तुडूंब भरुन वाहिल्याने या मार्गावरील वाहतूकही रात्रभर बंद होती. येथीलच पूलावरुन पाणी वहात असतानाही दुचाकीवरुन ओढा ओलांडण्याचा प्रयत्न करताना एका दुचाकीसह त्यावरील दोघेजण वाहून गेले परंतू ते दोघेही पाण्याबाहेर येण्यात यशस्वी ठरले. आदर्की परिसरातील सासवड-हिंगणगाव, कापशी-हिंगणगाव हे रस्तेही पावसाने खचले आहेत.
सासकल येथील ओढ्यावर असलेल्या एका पूलाचा काही भाग वाहून गेला आहे. तसेच सासवड ते हिंगणगाव या रस्त्यावरील वाहतूक रात्रभर बंद होती. जावली व आंदरुड गावच्या परिसरात काही घरांच्या भिंती पावसामुळे कोसळल्या आहेत, तर पावसाने या परिसरातील मका व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. बारामती तालुक्यात पाहुणेवाडी येथील ओढ्यावरील पुर्णतः खचल्याने फलटण-बारामती वाहतूक बंद झाली आहे.
कांबळेश्वर येथे नीरा नदीच्या पात्रात असलेल्या भिवाई देवीच्या मंदीरास नीरा नदीतील पूराच्या पाण्याने वेढल्याने या मंदीरात कालपासून अडकलेल्या गौंडवाडी ता. सांगोला, जि. सोलापूर येथील गोरख नामदेव शेंडगे या ५५ वर्षीय भाविकास आज दुपारी तीनच्या सुमारास विशेष रेस्क्यू अॉपरेशनद्वारे सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. गेल्या चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसाने ठिकठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने व शेतामध्ये पाणी साठल्याने शेतकरी, नागरीक व प्रवाशी यांना त्याचा मोठा फटका बसला. शेतकर्यांचेही मोठे नुकसान झाले असून त्याचे तातडीने पंचनामे व्हावेत अशी मागणी होत आहे.
फलटण शहरात दत्तमंदीर परिसराची मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केली त्यावेळी त्यांच्या समवेत भाऊ कापशे, नगरसेवीका प्रगती कापसे, सौ. दीपाली निंबाळकर, नगरसेवक अशोकराव जाधव, पांडूरंग गुंजवटे, किशोरसिंह ना. निंबाळकर, राहूल निंबाळकर आदी उपस्थित होते.
दरम्यान गेली तीन चार दिवस तालुक्यात पाऊस पडत आहे. गेल्या चोवीस तासात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ठिकठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी पूर पाहण्यासाठी रस्त्यावर येवू नये. पूलावर उभे राहून सेल्फी अथवा फोटो घेणे टाळावे. लोकांनी घरातच थांबावे. अजूनही मोठ्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने लोकांनी घराबाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहण प्रांत अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी नागरिकांना केले आहे.