शिखर- शिंगणापुरच्या घाटात पावसाने तयार झालेल्या धबधब्याचे चित्र.
शिंगणापुरच्या घाटात निर्माण झाले धबधबे
स्थैर्य, म्हसवड दि. ३० : माण तालुक्यासह म्हसवड शहर व परिसरात गत काही दिवसांपासुन पावसाची संततधार सुरु असल्याने परिसरातील सर्व रस्ते व सखल भागात चांगलेच पाणी साचल्याचे चित्र आहे, तर दि.३० रोजी झालेल्या मुसळधार पावसाने माळरानावरुन चांगलेच पाणी धावल्याचे पहावयास मिळाल्याने म्हसवड परिसरात पावसाने चांगलाच दणका दिल्याचे दिसुन आले.
माण तालुका म्हटले की सर्वांच्या समोर उभारतो तो येथील दुष्काळ, दुष्काळ अन माण तालुक्याचे जणु काही एक अतुट असे नातेच आहे त्यामुळेच या तालुक्यात दरवर्षी काही ठिकाणच्या गावांसाठी पाण्याचे टँकर प्रशासनाला सुरु करावे लागत असल्याचे आजवरचे येथील चित्र आहे. या तालुक्यात पाऊस हा अत्यल्प पडतो त्यामुळे पावसावर अवलंबुन असलेल्या शेतकर्यांचा शेती व्यवसाय हा बेभरोशी असाच राहिला आहे. त्यामुळे माण तालुक्यातील शेतकर्यांच्या पशुधनासाठी शासनाला तालुक्यात वेळोवेळी चारा छावण्या कराव्या लागतात. यंदा मात्र पाऊस हा सरासरी पेक्षा जादा पडणार असल्याचे यापुर्वीच वेधशाळेने वर्तवले असले तरी त्याचा फायदा माण तालुक्याला कितपत होणार असा प्रश्न माण वासीयांतुन विचारला जात असतानाच मान्सुनच्या सुरवातीलाच माण तालुक्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने बळीराजांतुन समाधान व्यक्त होत आहे.
नेहमीच परतीच्या पावसावर जगणारा माण तालुका हा यंदा सुरुवातीलाच मान्सुनने येथे हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने आनंदीत आहे.
माण तालुक्यातील हिरवळीने नटलेली माळराने.
दरम्यान म्हसवडसह परिसरात गत तीन दिवसांपासुन पावसाने संततधार हजेरी लावण्यास सुरुवात केली असल्याने म्हसवडसह परिसरातील सर्व रस्ते व सखलभाग हे जलमय झाल्याचे दृष्य आहे, तर या पावसामुळे यंदा प्रशासनाला पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करावे लागणार नसल्याचे नागरीकांतुन बोलले जात असुन मान्सुनच्या सुरुवातीलाच पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली असुन यंदा जिल्ह्याच्या पश्चिमेला अद्याप समाधानकारक पावसाने हजेरी लावली नाही मात्र पश्चिमेला असलेल्या माण तालुक्याला मात्र आत्तापर्यंत पावसाने ४ ते ५ वेळा चांगलेच झोडपुन काढले असल्याने माण तालुक्यातील आजवर बोडकी दिसणारी माळराने हिरवळीने नटल्याचे चित्र आहे. तर शिखर – शिंगणापुरच्या घाटात पावसामुळे धबधबे तयार झाल्याचे चित्र असुन हे धबधबे पाहिल्यावर हा माण तालुका आहे की कोकण असा प्रश्न पडल्यावाचुन रहात नाही.