
स्थैर्य, फलटण, दि. १८ ऑगस्ट : नीरा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. यामुळे भाटघर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, निरा देवघर धरणही शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. वाढलेल्या पाण्याची आवक लक्षात घेता, दोन्ही धरणांमधून नीरा नदीच्या पात्रात ९,२८९ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
नीरा उजवा कालवा विभागाने आज, दि. १८ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, भाटघर धरण १०० टक्के भरले असून, निरा देवघर धरण ९८.२९ टक्के भरले आहे. या दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे भाटघरमधून ५,११४ क्युसेक्स आणि निरा देवघरमधून ४,१७५ क्युसेक्स असा एकूण ९,२८९ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
खोऱ्यातील एकूण पाणीसाठा आता ९५.९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. वीर धरणात ९०.७५ टक्के, तर गुंजवणी धरणात ७६.४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

