
दैनिक स्थैर्य | दि. १० मार्च २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील अनेक रस्त्यांची दूरवस्था झालेली आहे. या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा केल्याने सध्या तालुक्यामध्ये विकास निधीचा पाऊस पडत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी तसेच नवीन रस्त्यांसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून फलटण तालुक्यातील रस्त्यांसाठी ११.९५ कोटींची कामे मंजूर करण्यात यश आले आहे.
खासदार रणजितसिंह हे दर दोन दिवसांनी तालुक्यातील विविध कामांच्या निधी मंजुरीच्या आनंदाची बातमी घेऊन येत आहेत. त्यामुळे फलटण तालुका आता विकासाकडे वाटचाल करीत आहे. निरा-देवघर, नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहत, बजेटमध्ये रेल्वेसाठी तरतूद, झिरपवाडी रुग्णालय, जन सुविधा अशी अनेक विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत.
तालुक्यातील अनेक रस्त्यांची झालेली दूरवस्था यानिमित्ताने दूर होईल व रस्त्यांचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. यामध्ये फलटण तालुक्यातील ढवळ ते शेरेचीवाडी कामाची अंदाजित रक्कम (रुपये लक्ष) २१८.१६, निरगुडी ते विचुर्णी २५२.९१, विडणी दहाबिगा २०५.०६, प्रजिमा ६७ ते फडतरे वस्ती २९६.५५ तसेच मलवडी १४९ एसएच ते बरकडे वस्ती २२२.०६ एवढ्या रकमेची कामे मंजूर झाली आहेत.
फलटण तालुक्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विविध कामे मंजूर करून घेत आहेत. सर्वात महत्त्वाची दळणवळणाची कामे सुलभ झाल्यास त्या भागाचा आर्थिक विकास होतो. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून ही कामे मंजूर केलेली आहेत. यामुळे या परिसरातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.