दैनिक स्थैर्य । 18 जून 2025 । सातारा । जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून सकाळपर्यंतच्या 24 तासांत कोयनानगर येथे 104 तर नवजाला 80 मिलीमीटरची नोंद झाली. त्याचबरोबर कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून सायंकाळी पाचपर्यंतच्या नऊ तासांत साठ्यात सुमारे पावणे दोन टीएमसीने वाढ झाली आहे. या पावसामुळे पश्चिम भागात रस्त्यावर झाडे पडत असून दरडीही कोसळू लागल्यात.
जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनच्या पावसाने काहीशी दडी मारली होती. पण, तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा पडू लागला आहे. तर पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत चालला आहे. एकसारखा पाऊस पडत असल्याने ओढे, नाले खळाळून वाहू लागलेत. त्यातच पश्चिम भागातच जिल्ह्यातील प्रमुख धरणे आहेत. या धरणक्षेत्रातही पाऊस पडत आहे. यामुळे धरणात पाणी आवक सुरू झाली आहे. परिणामी धरण पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.
सकाळी आठपर्यंतच्या 24 तासांत सर्वाधिक पर्जन्यमान कोयनानगर येथे नोंद झाले आहे. 104 मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे 80 आणि महाबळेश्वरला 70 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. एक जूनपासूनचा विचार करता आतापर्यंत कोयनेला 251, नवजा 241 आणि महाबळेश्वर येथे 196 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.
संपूर्ण कांदाटी खोर्यातही पाऊस होत आहे. यामुळे कोयना धरणात येणार्या पाण्याची आवक वाढलेली आहे. सायंकाळच्या सुमारास 12 हजार 538 क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणात 24.16 टीएमसी पाणीसाठा झाला होता.

