दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑगस्ट २०२२ । सोनेवडी। गेल्या चार दिवसांपासून परळी ठोसेघर, सांडवली, आलवडी परिसरात पावसाने हाहाकार केला असून उरमोडी धरण, लघु पाटबंधारे जवळपास पुर्ण क्षमतेने भरले आहेत. तसेच अनेक ठिकाणी वादळ वाऱयांमुळे झाडे उनमळून पडली आहे. यामुळे वाहतूक विस्कळीत झाले आहे.
पावसाची संततधार दिवसेंदिवस वाढत असल्याने उरमोडीचा विसर्ग सोमवार पासून टप्प्या टप्प्याने वाढवला आहे. त्यामुळे उरमोडी नदी दुथडी भरुन वाहत आहे. विसर्ग वाढल्याने परळी ते पाटेघर रस्त्यावर असलेल्या उरमोडी नदीच्या पुलाला पाणी टेकले आहे. नदी पात्रालगत असलेल्या शेतात पाणी घुसल्याने शेतीचे नुकसान मोठय़ा प्रमाणावर झाले आहे. ठोसेघर पठारावर असलेल्या जगमीन, चिखली धरण, पळसावडे, पांगारे धरणांच्या सांडव्यावरुन पाणी वाहून लागले आहे. पांगारे येथील धरणाच्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातूनच प्रवास करावा लागत आहे. तसेच कुस बुद्रक येथे शाळेच्या इमारतीवर झाड उनमळून पडले आहे. जळकेवाडी येथे घराचे पत्रे उडून गेले आहेत. परळी-सातारा मार्गावर डबेवाडी व गजवडी (गोळेवाडी) येथे रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. चिखली, जांभे, अलवडी येथे रस्त्यावर मोठ-मोठे दगड पाण्याच्या प्रवाहात वाहून रस्त्यावर आल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.
उरमोडीतून विसर्ग वाढला!
उरमोडी धरणक्षेत्रात पाण्याची आवक मोठय़ाप्रमाणावर होत असल्याने बुधवारच्या तुलने गुरुवारी सकाळी विसर्ग हा वाढवण्यात आला आहे. सकाळी 8 च्या अहवालानुसार उरमोडी धरण क्षेत्रातून विद्युत गृहातून 500 क्यूसेक व सांडव्यातून 4554 क्यूसेक असा एकून 5054 क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.