दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांकडून छापा टाकण्यात आले आहेत. शाहूपुरी पोलिसांनी समर्थ मंदिर, मनामती चौक, राजधानी टॉवर या तीन ठिकाणी तर कोरेगाव तालुक्यातील वाठार पोलिसांनी पिंपोडे बुद्रूक येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, समर्थ मंदीर चौकात इमारतीच्या आडोशाला इम्रान इकबाल शेख (वय ४१, रा. बसापा पेठ, करंजे, सातारा) हा जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १,४६२ रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनामती चौकात टाकलेल्या छाप्यात सचिन साहेबराव निकम (वय ४0, रा. सोमवार पेठ, सातारा) याच्यावर कारवाई करण्यात आली असून त्याच्याकडून ११६२ रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. सातारा शहरातील राजधानी टॉवरच्या भिंतीच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. येथे पोलिसांनी शरद शामराव साळुंखे (वय ५४, रा. साई कॉलनी, शाहूनगर, सातारा) याच्यावर कारवाई करण्यात आली असून त्याच्याकडून ५६२ रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
दरम्यान, कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे जुगारअड्डा चालवणाऱ्या मधुकर हरिभाऊ बाबर(वय ६0) याच्यावर वाठार पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत त्याच्याकडून ४0२ रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.