पाणीपुरवठा सभापती पदाची सूत्रे हाती घेताच राहुल निंबाळकर ‘ॲक्शन मोड’मध्ये! अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत दिले ‘हे’ कडक निर्देश


फलटण नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा सभापती पदाची सूत्रे स्वीकारताच नगरसेवक राहुल निंबाळकर यांनी पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक घेतली. नागरिकांना वेळेत आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्याचे सक्त निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले असून, पक्षश्रेष्ठींचे मानले आभार.

स्थैर्य, फलटण, दि. 27 फेब्रुवारी : फलटण नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडीत ‘पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती’च्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या सभापतीपदी नगरसेवक राहुल निंबाळकर यांची आज बिनविरोध निवड झाली. या पदाची सूत्रे हाती घेताच राहुल निंबाळकर हे लगेचच ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची एक विशेष बैठक घेतली.

सद्यस्थितीचा आढावा आणि कडक सूचना

या बैठकीत सभापती राहुल निंबाळकर यांनी फलटण शहरातील पाणीपुरवठ्याच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. कुठे पाणी टंचाई आहे, कुठे गळती आहे आणि पाणी वितरणाच्या वेळा काय आहेत, याची सविस्तर माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. आगामी काळामध्ये पाणीपुरवठा वितरण प्रणालीमध्ये कोणते सकारात्मक आणि तांत्रिक बदल करणे अपेक्षित आहे, याबाबतची स्पष्ट कल्पना त्यांनी प्रशासनाला दिली.

यावेळी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देताना निंबाळकर म्हणाले, “फलटण शहरातील सर्व नागरिकांना ठरलेल्या वेळेत आणि योग्य दाबाने (Pressure) पाणी पोहोचलेच पाहिजे. यासाठी जे काही नियोजन करावे लागेल ते तत्काळ करा. नागरिकांना पाण्यासाठी कोणतीही अडचण येऊ देऊ नका आणि यात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

“नेत्यांचा विश्वास सार्थ ठरवणार” : राहुल निंबाळकर

पाणीपुरवठा विभागाची मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राहुल निंबाळकर यांनी आपल्या नेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

ते म्हणाले की, “माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगावचे आमदार सचिन पाटील साहेब, सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी माझ्यावर मोठा विश्वास ठेवून पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी टाकलेला हा विश्वास सार्थ ठरवत ही दिलेली जबाबदारी नक्कीच यशस्वीपणे पार पाडण्याचा आणि फलटणकरांना सुरळीत पाणीपुरवठा देण्याचा प्रयत्न मी अविरत करत राहीन.”

पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी राहुल निंबाळकर यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे, आगामी काळात शहरातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारी नक्कीच मार्गी लागतील, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!