स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२४: कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेसच्या राष्ट्रपती भवनावरील मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. यानंतरही मोर्चासाठी रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी हे राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेले आहेत. तर दुसरीकडे मोर्चामध्ये सहभागी झालेल्या प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रियांका गांधी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मोदी सरकार त्यांच्या हट्टावर कायम आहे. जो कोणी सरकारला प्रश्न विचारतो त्याला देशद्रोही ठरवलं जात आहे. सरकारच्या नजरेत शेतकऱ्यांसाठी कोणताच आदर नसल्याचंही प्रियांका गांधी म्हणाल्या.
राहुल गांधी यांच्यासह तीन नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. काँग्रेसला राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही मोर्चा काढल्यानंतर प्रियांका गांधींसह काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यत घेतलं. दरम्यान, त्याआधी काँग्रेसचं मुख्यालय असलेल्या भागात कलम 144 लागू करण्यात आले आणि राष्ट्रपती भवनाजवळची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधींनी म्हटलं की, भारताचे शेतकरी त्रासापासून वाचण्यासाठी कृषी विरोधी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनात आपण सर्वांनी देशाच्या अन्नदात्यांना साथ द्यायला हवी.