स्थैर्य, रहिमतपूर, दि. 20 : रहिमतपूर नजीक असणा-या वेळू व न्हावी बुद्रुक या गावात प्रत्येकी एक एक पाॅझिटीव्ह रुग्ण सापडल्याने रहिमतपूरसह परिसरात खळबळ उडाली आहे. या करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रहिमतपूरकरांनी घरातच राहावे कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. असे आवाहन रहिमतपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, रहिमतपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ , मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार अधिसूचनाही निर्गमित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर रहिमतपूर नगरपरिषद हद्दीतील दवाखाने व औषधे दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, व्यापारी दुकाने बंद राहतील. तसेच परगावहून येणाऱ्या लोकांना शहरात कोणत्याही प्रकारचा कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. मास्कचा वापर न करणा-या व कारणाशिवाय शहरात फिरणा-या दुचाकीस्वरांवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.