स्थैर्य, खंडाळा, दि. 13 : खंडाळा तालुक्यातील कर्णवडी याठिकाणी प्रेमसंबंधामधून लग्न लावण्याच्या कारणातून दोन गटामध्ये झालेल्या राड्यामध्ये परस्पर तक्रारीवरून 25 ते 30 जणांविरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 9 जणांना अटक करण्यात आली असून 1 चारचाकी व 1 दुचाकी वाहने जप्त करण्यात आले असून फरार आरोपींना पकडण्याकरिता विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहे.
याबाबतची पोलीसांनी दिलेली माहिती अशी कि, कर्णवडी ता.खंडाळा येथील सचिन एकनाथ जाधव याचे अतिट ता.खंडाळा येथील एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. त्यामुळे दोघेही प्रेमसंबंधातून लग्न करणार होते. दरम्यान, याबाबतची माहिती कुटुंबियांना समजल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी डिसेंबर 2019 रोजी आपापसात समजुत करून प्रकरण मिटविले होते.
यावेळी 12 जून रोजी सचिन जाधव याचे आई-वडिलांनी पुन्हा अतीट येथे जाऊन पुन्हा संबंधित मुलीच्या कुटुंबियांना लग्नाकरिता मागणी घातल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये वादावादी झाल्यानंतर कर्णवडी येथील जाधव कुटुंबीयांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशन याठिकाणी अदखलपात्र गुन्हा दखल करण्यात आला होता. त्यावरून घडलेल्या घटनेचा राग मनात धरून त्याचा जाब विचारणेकरिता अतिट येथील सचिन जयवंत जाधव याने कारमधून रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान किशोर विनायक जाधव ,सचिन अशोक जाधव ,संदीप दिगंबर जाधव,स्वप्नील तुकाराम जाधव यांना त्याचे गाडीतून तसेच इतर 18 ते 20 लोकांना 11 दुचाकीवरून घेऊन कर्णवडी येथे सचिन एकनाथ जाधव याच्या घरात घुसून काठी व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली असता गावातील नागरिकांनी संबंधितांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता संबंधित हे 35 ते 40 लोकांचा जमाव असल्याने संबंधित समजून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. यावेळी कर्णवडी येथील नागरिकांनी राडा करणाऱ्यांपैकी 5 जणांना पकडून ठेऊन याबाबतची माहिती खंडाळा पोलीसांना दिली.
यावेळी घटनेची माहिती मिळताच तत्काळ खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड ,पोलीस हवालदार नितीन नलावडे , संजय थोरवे, प्रशांत धुमाळ,सचिन वीर , शिवशंकर तोटेवाड हे घटनास्थळी पोहोचले असता दोन्ही कुटुंबीयांमध्ये तुंबळ मारामारी चाललेली होती. यावेळी पोलीसांची चाहूल लागताच मारामारी करणा-यांनी कार व तब्बल 12 दुचाकी घटनास्थळावर सोडून अंधाराचा फायदा घेऊन डोंगरच्या दिशेने पोबारा केला.
याप्रसंगी खंडाळा पोलीसांनी दोन्ही गटांमधील 9 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 1 कार 11 दुचाकी जप्त करण्यात आले असून इतर फरारी आरोपींचा खंडाळा पोलीसांनी शोध घेण्याकरीता विविध ठिकाणी पथके रवाना केली आहे.
यामध्ये परस्पर विरोधी तक्रारीवरून खंडाळा पोलीस स्टेशनला 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला असून यामध्ये आणखी कोना-कोणाचा सहभाग याबाबतचा तपास खंडाळा पोलीस करीत आहे. यावेळी सचिन एकनाथ जाधव याच्या फिर्यादीवरून सचिन जयवंत जाधव ,किशोर विनायक जाधव, सचिन अशोक जाधव, संदीप दिगंबर जाधव, स्वप्नील तुकाराम जाधव व इतर 18 ते 20 (सर्व रा. अतिट ता.खंडाळा) तर सचिन जयवंत जाधव याच्या फिर्यादीवरून सचिन एकनाथ जाधव, बापू एकनाथ जाधव, नितीन रमेश जाधव, मनोज मोहन जाधव यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार सुरेश मोरे, प्रशांत धुमाळ हे करीत आहे.