दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑक्टोबर २०२३ | सातारा |
भारतीय माजी नौदल अधिकार्यांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्याची अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता आहे. भारत सरकारने या माजी नौसैनिकांची सुटका करण्यासाठी प्रभावी राजनैतिक तसेच न्यायीक हस्तक्षेप करावा, अशी मागणी सातारा जिल्हा माजी नौसैनिक असोसिएशनने जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, कतारच्या सर्वोच्च न्यायालयाने ८ माजी नौदल अधिकार्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे व त्याची कतार सरकारतर्फे अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता आहे. हे देशवासियांसाठी धक्कादायक तर आहेच; परंतु संबंधित कुटुंबांना उद्ध्वस्त करणारेही आहे. या माजी नौसैनिकांनी त्यांच्या तारुण्यात देशाची सेवा करताना सर्वोत्तम योगदान दिले आहे.
भारत सरकारने या माजी नौसैनिकांची सुटका करण्यासाठी प्रभावी राजनैतिक तसेच न्यायिक हस्तक्षेप करावा. भारतीय सैन्य दलाच्या सर्वोच्च कमांडर म्हणून राष्ट्रपतींनी भारत सरकारला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशीही मागणी निवेदनात केली आहे. उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांना निवेदन देतेवेळी वसंतराव नलवडे, शंकर माळवदे, अशपाक पटेल, राजेंद्र निकम, अरविंद पाटील, जीवन शिंगाडे, संतोष भोसले, उमेश साळुंखे आदी उपस्थित होते.