रुग्णसेवेसाठी पुष्कर कोव्हीड केअर सेंटर पुन्हा सज्ज ८० बेडच्या सेंटरमध्ये ३२ बेड ऑक्सिजन युक्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २३: कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे संपुर्ण देशात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रासह आपल्या सातारा जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधीतांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली आहे. जम्बो कोव्हीड केअर सेंटर, सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खाजगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नाही आणि त्यामुळे रुग्ण दगावत आहेत. या भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतुने आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटूंबीयांनी पुष्कर मंगल कार्यालयात पुन्हा कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला असून ३२ ऑक्सिजनयुक्त बेडसह ८० बेडचे पुष्कर कोव्हीड केअर सेंटर पुन्हा एकदा रुग्ण सेवेसाठी सज्ज  होत असून येत्या दोन दिवसात हे सेंटर चालू होणार आहे.
गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वमालकीच्या विसावा नाका येथील पुष्कर हॉल येथे स्वखर्चाने ८० बेडचे सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर उभारून विनामोबदला रूग्णसेवेसाठी उपलब्ध करून दिले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे सेंटर बंद करण्यात आले होते. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि बेड मिळाला नाही म्हणून कोणाचा जीव जाऊ नये या उदात्त हेतूने आ. शिवेंद्रसिंहराजे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हे सेंटर पुन्हा रुग्णसेवेसाठी स्वखर्चाने तयार करून श्वास हॉस्पिटलकडे चालवण्यासाठी दिले आहे.
स्व. भाऊसाहेब महाराजांना १९७८ पासून सातार्‍यातील जनतेने भरभरुन प्रेम आणि साथ दिली. त्यांच्या पश्‍चात सातारकर आणि सातारा- जावली तालुक्यातील जनतेने माझ्यावर आणि माझ्या कुटूंबावर वडीलकीचे छत्र धरुन कायम पुत्रवत प्रेम आणि आपुलकीची साथ दिली आहे. ज्या छत्रपतींच्या घराण्यात आम्ही जन्माला आलो, ज्या घराण्याचे वंशज म्हणून आम्हाला ओळखले जाते, त्याच घराण्याचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न नेहमी करत आलो आहे. ज्या जनतेने आजवर आमच्या कुटूंबाला भरभरुन दिले त्या जनतेसाठी कोरोना महामारीच्या गंभीर आणि कठीण परिस्थितीत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याच उद्देशाने, कोरोना रुग्णांना उपचाराची सुविधा मिळावी म्हणून हे सेंटर पुन्हा सुरु करत असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
वास्तविक या सेंटरमध्ये ८० बेड असून त्यापैकी ३२ बेड हे ऑक्सिजनच्या सुविधेसह उपलब्ध होणार आहेत. गतवर्षी हे सेंटर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आले होते मात्र वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध न झाल्याने खाजगी हॉस्पिटलकडे चालवण्यासाठी देण्यात आले होते. यावेळी हे सेंटर डॉ. ऋतुराज देशमुख,  डॉ. विक्रांत देशमुख यांच्या श्वास हॉस्पिटलकडे विनामोबदला चालवण्यासाठी देण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात हे सेंटर प्रत्यक्ष सुरु होणार असून कमीत कमी खर्चात रुग्णसेवा देण्याच्या सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे आणि सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी श्वास हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला केल्या आहेत.

Back to top button
Don`t copy text!